Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडियाज बेस्ट ड्रामेबाझचे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 09:32 IST

आपल्या पहिल्या दोन पर्वांमध्ये भारतातील छोट्‌या कलाकारांचे अभिनय कौशल्य आणि हरहुन्नरीपणा साजरा करत झी टीव्हीवरील टॅलेन्ट हंट कार्यक्रम इंडियाज ...

आपल्या पहिल्या दोन पर्वांमध्ये भारतातील छोट्‌या कलाकारांचे अभिनय कौशल्य आणि हरहुन्नरीपणा साजरा करत झी टीव्हीवरील टॅलेन्ट हंट कार्यक्रम इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ आपल्या तिसऱ्या पर्वासह परत सुरू होत आहे. अभिनयाच्या क्षेत्रात आपले असे खास स्थान निर्माण केलेले कार्तिकेय राज, कार्तिकेय मालविय, तमन्ना दिपक, प्रणीत शर्मा अशा अनेक गुणी कलाकारांसाठी संधीचे दालन उघडल्यानंतर ह्या कार्यक्रमाचे नवीन पर्व यातील नवीन कलाकारांना त्यांच्या अभिनय कौशल्यात भर टाकण्यासाठी आणि उद्याचे सुपरस्टार्स म्हणून उदयास येण्यासाठी संधी प्रदान करेल. आपली खरोखरची आवड शोधून काढून मनोरंजन उद्योगात अभिनय क्षेत्रात वाटचाल करून आपले असाधारण भविष्य घडवण्यासाठी इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ हा कार्यक्रम झी टीव्हीचे मुख्य तत्त्व आज लिखेंगे कल सोबत उत्तमप्रकारे अनुरूप आहे. ह्या छोट्‌या कलाकारांना त्यांच्या ह्या प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी आणि अभिनयातील बारकावे शिकवण्यासाठी ह्या उद्योगातील नावाजलेली मंडळी - सुंदर सोनाली बेंद्रे आणि हरहुन्नरी अभिनेता विवेक ओबेरॉय हे यातील परीक्षक मंडळात असतील. विवेक ओबेरॉय ह्या शोसोबत तिसऱ्यांदा संलग्न होत आहे. उत्तम कथाकार आणि गुणी कला दिग्दर्शक ओमंग कुमार ह्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक म्हणून कामाला सुरूवात करून आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवतील. लोकप्रिय नर्तक आणि अभिनेता शांतनु महेश्वरी आणि बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे अग्रगण्य कलाकार विघ्नेश पांडे ह्या पर्वात सूत्रधार असतील आणि आपल्या वनलायनर्स, मैत्रीपूर्ण विनोद आणि खेळीमेळीसह मनोरंजनात भर टाकतील. ह्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक म्हणून सोनाली बेंद्रे पुनरागमन करत असून ती म्हणते, “जेव्हा जेव्हा इंडियाज्‌ बेस्ट ड्रामेबाझच्या नवीन पर्वाची घोषणा होते, तेव्हा तेव्हा एक वेगळ्‌या प्रकारची उत्कंठा ह्या कार्यक्रमाबद्दल निर्माण होते. मला हा कार्यक्रम नेहमीच आवडलेला आहे कारण हा आपल्या देशात सर्वोत्तम अभिनय कला दडलेली आहे. बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय ह्या कार्यक्रमाच्या सुरूवातीपासून संलग्न आहे. तो म्हणाला, “इंडियाज बेस्ट ड्रामेबाझसोबत पुन्हा एकदा संलग्न होताना खूप छान वाटतंय. हा कार्यक्रम माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ आहे कारण मला देशातील काही सर्वोत्तम कलाकारांना पाहण्याची आणि त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळते. ह्या कार्यक्रमाने आपल्या काही उत्तमोत्तम सुपरस्टार्स मिळवून दिले आहेत आणि असे अनेक हिरे आजही आपल्या देशातील कानाकोपऱ्यात दडलेले आहेत, ज्यांचा शोध लागायचा आहे. ह्या मुलांना मार्गदर्शन करण्यापेक्षा अधिक मला ह्या भारतातील छोट्‌या कलाकारांसोबत धम्माल करण्याची जास्त उत्सुकता आहे.”इंडियाज बेस्ट ड्रामेबाझमध्ये मार्गदर्शक म्हणून आपल्या टीव्ही पदार्पणाबद्दल ओमंग कुमार म्हणाला, “मी माझ्या करिअरची सुरूवात २५ वर्षांपूर्वी झी टीव्हीवरील कार्यक्रम ‘जस्ट एक मिनट’ मधून टेलिव्हिजन शो  सूत्रधार म्हणून केली. आता आयुष्याचे वर्तुळ जणू पूर्ण झाले आहे कारण मी आता इंडियाज बेस्ट ड्रामेबाझमध्ये परीक्षक म्हणून ह्या वाहिनीवर परतलो आहे. ह्या कार्यक्रमाचे आधीचे सीझन्स मी पाहिले आहेत आणि ते पाहताना ह्या कार्यक्रमातील मुलांच्या कलेसह त्यांची ऊर्जा आणि निरागसता पाहताना मला खूप मजा आली. हा कार्यक्रम अनेक नन्ह्या कलाकारांना त्यांच्या करिअर आणि आयुष्याला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि माझ्या कौशल्यासह अभिनयाची आवड असलेल्या ह्या नवीन बॅचला मार्गदर्शन करण्यासाठी मी उत्सुक आहे.”मुंबई, दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, रांची, पाटणा, जयपुर, अमृतसर, चंदिगड, लखनौ, बेंगलोर, इंदौर, अहमदाबाद इथे ऑडिशन्सचे आयोजन करण्यात येत असून सर्वोत्तम कला शोधून काढण्यासाठी ह्या कार्यक्रमाने अजिबात कसर बाकी ठेवलेली नाही. यात निवड झालेल्या स्पर्धकांना मार्गदर्शकांच्या पॅनलसमोर परफॉर्म करण्याची आणि आपल्या अभिनय मंत्रांसह आपला ठसा उमटवण्याची सुवर्ण संधी मिळेल.