जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला, त्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यात मृत्यू पडलेल्या कुटुंबातील सदस्यांसोबत संपर्क साधून तिथे नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी त्याच गोष्टी बोलल्या जात आहेत, यावर अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने नाराजी व्यक्त केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मीडियाला फटकारलं आहे.
शिवानी सुर्वे हिने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले की, लोकांनी, विशेषतः मीडियाने थोडा विचार करावा. सतत पीडितांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे इंटरव्ह्यू घेणं, पुन्हा पुन्हा तेच विचारणं, एका मागोमाग एक सोलो इंटरव्ह्यू पोस्ट करणं हे थांबवलं पाहिजे. हे काही टीव्ही शो नाहीये. हे एखाद्या चॅनेलचं टीआरपी वाढवण्याचं साधन नाही. मीडियाने थोडं शहाणपण वापरावे. ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे, त्यांना शांतपणे श्वास घेऊ द्या. त्यांच्या आयुष्यात जे घडलंय ते फार वेदनादायक आहे. आपण त्यांच्या दुःखाचा सन्मान केला पाहिजे, त्यांना त्रास देणं बंद केलं पाहिजे.
वर्कफ्रंटअभिनेत्री शिवानी सुर्वे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने साकारलेली मानसी प्रेक्षकांना खूप भावली. तसेच तिचा या वर्षात जिलबी हा सिनेमादेखील भेटीला आला. यात तिच्यासोबत स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक मुख्य भूमिकेत होते.