कुशलला कसलीच घाई नाहीये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 18:32 IST
सारेगमपाचा विजेता कुशल पॉलने नुकतीच लोकमत ऑफिसला भेट दिली. त्याला मिळालेल्या या यशामुळे तो सध्या खूपच खूश आहे. कुशल ...
कुशलला कसलीच घाई नाहीये
सारेगमपाचा विजेता कुशल पॉलने नुकतीच लोकमत ऑफिसला भेट दिली. त्याला मिळालेल्या या यशामुळे तो सध्या खूपच खूश आहे. कुशल तीन वर्षांचा असल्यापासून गाणे शिकत आहे. यामुळे त्याला लहानपणापासूनच गाण्याची गोडी निर्माण झाली असे तो सांगतो. त्याने आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत पण या सगळ्या पुरस्कारांमध्ये सारेगमपाचा पुरस्कार हा अधिक स्पेशल असल्याचे त्याचे म्हणणे आहे. कुशलने याआधी झी बांगला वाहिनीवरील सारेगमपा या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच काही बंगाली चित्रपटात तो गायला आहे. त्यामुळे कुशल बंगाली भाषिक लोकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. कुशलला सोनू निगमचा आवाज खूपच आवडतो. त्याला आयुष्यात एकदा तरी भेटण्याची त्याची इच्छा आहे. कुशल गेली कित्येक महिने मुंबईतच आहे. पण आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तो त्याच्या घरी कोलकाताला जाणार आहे. याविषयी तो सांगतो, मी एक महिने तरी घरी जाऊन आराम करणार आहे आणि माझ्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करणार आहे. या कार्यक्रमाचे विजेतेपद मला मिळेल असे मला वाटलेच नव्हते. माझ्या नावाची घोषणा झाली, त्यावेळी एक क्षण मला माझेच नाव पुकारण्यात आले आहे यावर विश्वासच बसला नव्हता. केवळ लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचता यावे या उद्देशाने मी या कार्यक्रमात आलो होतो. पैसा कमवणे अथवा जिंकणे या गोष्टींचा मी विचारच केला नव्हता. मला जगभर फिरण्याची इच्छा आहे. मला माझ्या संगीतातून लोकांपर्यंत चांगला संदेश द्यायचा आहे. तसेच मला चित्रपटात गाण्याची काहीच घाई नाहीये. मला चांगल्या संगीतकारांच्या हाताखाली शिकायचे आहे. तांत्रिक गोष्टी योग्यप्रकारे शिकल्यानंतरच मी चित्रपटात गाण्याचा विचार करणार आहे. मला अनेक ऑफर्सही येत आहेत. पण सध्या मी काहीही विचार केलेला नाहीये. मला सारेगमपाच्या संपूर्ण प्रवासात खूप काही शिकायला मिळाले. आज कार्यक्रम संपला असला तरी या कार्यक्रमाने खूप चांगले मित्र, मार्गदर्शक दिले आहेत. या कार्यक्रमाची ट्रॉफी मी घरात खास कपाट करून त्यात कायमस्वरूपी ठेवणार आहे.