Join us

"नाकारलेल्या बाईच्या भूमिकेचा ट्रेंड आला आणि...", 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिकाबद्दल बोलली अनिता दाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:27 IST

अनिता दाते (Anita date)ची 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका खूप गाजली. या मालिकेत साकारलेली राधिका प्रेक्षकांना खूप भावली. नुकतेच एका मुलाखतीत तिने या मालिकेचा उल्लेख केला आहे.

अनिता दाते (Anita date) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिची कायम क्रेझ पाहायला मिळते. 'माझ्या नवऱ्याची बायको' (Mazya Navryachi Bayko Serial) ही तिची मालिका खूप गाजली. या मालिकेत साकारलेली राधिका प्रेक्षकांना खूप भावली. नुकतेच एका मुलाखतीत तिने या मालिकेचा उल्लेख केला आहे. तसेच तिने नाकारलेल्या बाईच्या भूमिकेचा ट्रेंडमुळे तिला कशी कामे मिळाली, याबद्दलही सांगितलं.

अनिता दाते म्हणाली की,''माझ्या सुदैवाने मधला एक काळ आला अन् त्याच्यामध्ये एक मुलगी किंवा एक स्त्री जिला सातत्याने नाकारलं जातंय. असा एक छान ट्रेंड आला आणि त्याच्यामध्ये मी फिट बसले मग मला त्या पद्धतीच्या खूप छान भूमिका मिळाल्या. माझ्या नवऱ्याची बायको इथे बायकोला नाकारलं जातं आणि नवरा दुसरीकडे जातो. डस्की मुलीकडे जातो. हा डस्की मुलीकडे सुंदर मुलीकडे जातो. वाळवीमध्ये त्या नवऱ्याला ती बायको नको असते. तो दुसरीकडे जातो. हा अर्थात त्या नाकारल्या गेलेल्या बाईचे विविध कंगोरेही असतात आणि सुदैवाने ते साकारायला मिळाले. अगदी तुंबाडमध्ये सुद्धा. मी वसंतरावमध्ये सुद्धा कारण ती एकटी बाई घरातून बाहेर पडते आणि लढते.'' 

''म्हणून 'माझ्या नवऱ्याची बायको' माझ्याकडे आली...''

ती पुढे म्हणाली,''तर काहीतरी असं आपल्या चेहऱ्यामध्ये आहे की ज्यामुळे ती गरीबही वाटू शकते आणि ती एक लढणारी बाईसुद्धा वाटू शकते. स्ट्रगल करणारी बाई सुद्धा वाटू शकते. असं काहीतरी आपल्या चेहऱ्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला ही भूमिका मिळालेली आहे. तर हे माझ्या असण्याचं यश आहे. मी जशी आहे तसं मला स्वीकारलं गेलं. तो तसा ट्रेंड आला म्हणून माझ्या नवऱ्याची बायको कदाचित माझ्याकडे आले.''

टॅग्स :अनिता दातेमाझ्या नवऱ्याची बायको