जय जय स्वामी समर्थ मालिका ( Jai Jai Swami Samarth Serial) स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अनोखा आध्यात्मिक सोहळा घेऊन येत आहे. जय जय स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष हा विशेष भाग ३१ मार्च रोजी रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जय जय स्वामी समर्थ मालिकेच्या आगामी भागात स्वामींच्या प्रकट दिनाचा भव्य प्रसंग उलगडला जाणार असून, त्यांच्या अद्भुत लीलेचे दर्शन घडणार आहे. भक्तांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या क्षणात, स्वामींच्या प्रत्यक्ष प्रकट होण्याची अनुभूती मिळणार आहे. "भक्तीचं बीज जेव्हा जेव्हा आमच्या मनात रुजत, तेव्हा तेव्हा आम्ही नव्याने प्रकट होतो," हा स्वामींचा दिव्य संदेश भक्तांच्या अंतःकरणात भक्तीचा प्रकाश जागवेल यात शंका नाही.
वटवृक्षाच्या साक्षीने घडणारा हा अलौकिक प्रसंग भक्तांना मंत्रमुग्ध करेल. विशेषतः स्वामींच्या तीन प्रकट रूपांचे दर्शन, भक्तांसाठी भक्ती व श्रद्धेचा नवा अध्याय उघडेल. या अलौकिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ‘जय जय स्वामी समर्थ’ प्रकट दिन विशेष, ३१ मार्च रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर ही मालिका पाहावी लागेल.