Join us
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील खऱ्या फॅक्टरीत शूट होतेय 'हुकुमाची राणी ही' मालिका, लवकरच येतेय भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:45 IST

Hukumachi Rani Hi Serial: 'सन मराठी' वाहिनीवर 'हुकुमाची राणी ही' नवीन मालिका भेटीला येणार आहे. या मालिकेतील नायक- नायिकेची गोष्ट ही फॅक्टरी मधूनच सुरु होणार आहे.

'सन मराठी' वाहिनीवर 'हुकुमाची राणी ही' (Hukumachi Rani Hi Serial) नवीन मालिका भेटीला येणार आहे. या मालिकेतील नायक- नायिकेची गोष्ट ही फॅक्टरी मधूनच सुरु होणार आहे. बऱ्याचदा मालिकांमध्ये ऑफिस, फॅक्टरी या ठिकाणांसाठी सेट उभारला जातो. पण या मालिकेचं शूटिंग साताऱ्यामधील खऱ्या फॅक्टरी मध्ये पार पडणार आहे. या मालिकेच्या टीमसाठी ही एक आव्हानात्मक बाब असणार आहे. 'हुकुमाची राणी ही' मालिका येत्या २१ एप्रिल पासून दररोज सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'हुकुमाची राणी ही' या मालिकेत अभिनेत्री वैभवी चव्हाण ही राणीची भूमिका तर इंद्रजीतची भूमिका अक्षय पाटील साकारत आहे. या दोघांबरोबरच अभिनेत्री अंकिता पनवेलकर,अभिनेते राहुल मेहंदळेंसह आणखी बरेच दिग्गज कलाकारही मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. मालिकेत राहुल मेहंदळे हे जयसिंगराव महाडिक या महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. महाडिक इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा जयसिंगराव महाडिक सेवानिवृत्त झाल्यानंतर महाडिक इंडस्ट्रीचा कारभार त्यांच्या मुलाकडे सुपूर्त करतात. जयसिंगराव असा निर्णय घेतात ज्यामुळे राणीचा महाडिक इंडस्ट्रीमध्ये प्रवेश होतो. आता माणुसकी जपणारी राणी व माणुसकी पेक्षा पैशाला महत्त्व देणारा इंद्रजीत समोरासमोर येणार तेव्हा नक्की काय होणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे. 

मालिकेच्या निर्मात्या अभिनेत्री श्वेता शिंदे म्हणाल्या की, "मालिकाविश्वात पहिल्यांदाच खऱ्या फॅक्टरी मध्ये 'हुकुमाची राणी ही' मालिकेचं शूटिंग सुरू केलं आहे. हे मोठं पाऊल आम्ही उचललं आहे. याचसह इंद्रजीत व राणीची नवी गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे. या मालिकेसाठी प्रेरणास्थान म्हणायला गेलं तर माझ्या आईची फॅक्टरी आहे. महाडिक इंडस्ट्री मध्ये जशी राणी आहे अगदी तशीच राणी आमच्या फॅक्टरी मध्ये पण होती. आणि त्या राणीला पाहूनच ही गोष्ट सुचली. या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन तर होईलच पण माणुसकी जपण्याचा सल्ला मिळणार आहे. प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोवर जसा प्रेमाचा वर्षाव केला अगदी तसेच मालिकेवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतील अशी खात्री आहे."