Join us

नवीन मालिका लवकरच येणार भेटीला, पाहायला मिळणार सायली-अर्जुनच्या नात्याची अनोखी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 18:35 IST

मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली असून सायली आणि अर्जुन या नव्या जोडीला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

स्टार प्रवाह(Star Pravah)च्या परिवारात ५ डिसेंबरपासून ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) ही नवी मालिका सामील होणार आहे. मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली असून सायली आणि अर्जुन या नव्या जोडीला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. जुई गडकरी आणि अमित भानुशालीसोबत ज्योती चांदेकर, सागर तळाशीकर, माधव अभ्यंकर, मीरा जगन्नाथ, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्ञानेश वाडेकर, नारायण जाधव अशी दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेत आहे. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली असून सचिन गोखले या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. 

या नव्या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘ठरलं तर मग ही एक प्रेम कथा आहे. प्रेम वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या परिस्थितीत घडतं. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच नाते संबंधांबद्दल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते. या मालिकेतूनही रसिकांना ब्रॅण्ड स्टार प्रवाहचा अनुभव येईल. ठरलं तर मग हे मालिकेचं शीर्षकच सांगतं की हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. हा निर्णय नेमका काय आहे? कश्यामुळे आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्की लागून राहिल याची खात्री आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत या मालिकेला सुद्धा भरभरुन प्रेम मिळेल अशी आशा आहे.’

ठरलं तर मग मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना जुई म्हणाली, ‘ही मालिका करताना मला अतिशय आनंद होत आहे. माहेरी आल्याची भावना आहे. सायली ही अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. नात्यांचं महत्व जाणणारी, अन्याय सहन न करणारी मात्र प्रचंड वेंधळी. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत मजेशीर प्रसंगही पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिकेचं बलस्थान आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतेय की इतक्या छान प्रोजक्टचा मला भाग होता आलं.’

अभिनेता अमित भानुशाली या मालिकेत अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘ही भूमिका साकारण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. आता पर्यंत मी रोमॅण्टिक हिरोची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील पात्र आजवर साकारलेल्या भूमिकांच्या पूर्णपणे वेगळं आहे. अर्जुन एक नामांकित वकील आहे. खूप कमी बोलणारा आणि कडक शिस्तीचा. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारताना माझी कसोटी लागतेय. आमच्या सेटवर खूपच खेळीमेळीचं वातावरण असतं. शूट संपल्यानंतरही घरी जायची इच्छा होत नाही. सहकलाकारांसोबत छान मैत्री झाली आहे. मुळात आमच्या सेटवर प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळेच सीन करताना मजा येते. पडद्यामागचा हा घट्ट बंध प्रेक्षकांना मालिका बघतानाही जाणवेल अशी भावना अमित भानुशालीने व्यक्त केली. नवी मालिका ‘ठरलं तर मग’ ५ डिसेंबरपासून रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :जुई गडकरीस्टार प्रवाह