झी मराठीवरील दोन मालिका 'लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas )आणि ‘पारू’ (Paru) यांचा महासंगम होणार आहे आणि मालिकेला एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे. जिथे जुन्या कॉलेजच्या आठवणी, गैरसमज, मैत्री आणि मंगळागौरी स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या महासंगमात अभिनेत्री निर्मिती सावंत यांची एन्ट्री होणार आहे. त्या पद्मावती घोरपडेच्या भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने लक्ष्मी आणि अहिल्या यांच्या कॉलेजमधील जुन्या मैत्रिणीची ही पुनर्भेट होणार आहे. मात्र ही मैत्री आनंदाच्या जागी गैरसमजाने भरलेली आहे.
पद्मावतीच्या मनात आजही आहे की, कॉलेजमध्ये लक्ष्मी आणि अहिल्याने तिची थट्टा केली होती आणि तिने त्याचा राग मनात धरलेला आहे. ती ही संधी साधून त्या दोघींना मंगळागौरीच्या स्पर्धेचं चॅलेंज देणार आहे. लक्ष्मी आणि अहिल्या सुरुवातीला काही उत्तर देत नाही. पण जेव्हा पद्मावती लक्ष्मीचं भाड्याचं घर विकत घेऊन तिला बाहेर काढायची धमकी देते, तेव्हा दोघी तिचं आव्हान स्वीकारतात. या स्पर्धेसाठी अहिल्या खास टीम तयार करणार आहे. जी त्यांना स्पर्धेत जिंकण्यास मदत करेल. पण या टीमचं एक गुपित आहे. हिच टीम पद्मावतीने आधीच विकत घेतलेली आहे. हा धक्कादायक ट्विस्ट या महासंगम भागात मोठा संघर्ष निर्माण करणार आहे.
पद्मावतीचा गैरसमज दूर होईल का?
लक्ष्मी आणि अहिल्याच्या पाठीशी त्यांच संपूर्ण कुटुंब उभे आहे. तर घरच्या सर्व स्त्रिया घराचं अस्तित्व आणि स्वाभिमान यासाठी एकत्र येऊन लढणार आहेत. आता लक्ष्मी आणि अहिल्या ही मंगळागौरची स्पर्धा जिंकतील ? पद्मावतीचा गैरसमज दूर होईल ? की स्पर्धा अजून मोठा वाद निर्माण करेल ? हे सगळं जाणून घेण्यासाठी 'पारू' आणि 'लक्ष्मी निवास' महासंगम पाहावे लागेल.