कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'आई तुळजाभवानी' (Aai Tulaja Bhavani Serial) मध्ये एक थरारक आणि भावनिक टप्पा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आई कोण?’ या मूलभूत प्रश्नावर समाजाने उचललेल बोटं, षड्रिपू मोहसारख्या स्त्रीरूपाचे अभेद्य मायाजाल आणि या सगळ्यावर देवी तुळजाभवानीचा न भूतों न भविष्यती असा दैवी हस्तक्षेप यामुळे हा भाग प्रेक्षकांसाठी नेत्रदीपक ग्राफिक्सची पर्वणी असणार आहे.
या विशेष भागात जगदंबा मिळणार या आनंदातमोह गावात उभी आहे. ती कुटील हसत म्हणते "तुला आता माझ्यापासून कुणीच वाचवू शकणार नाही. कारण सौंदर्याच्या जाळ्यात कुणालाही अडकवून, मी हवं तसं खेळवू शकते आणि मला जे हवे ते मिळवू शकते" मात्र त्याच क्षणी छोटी जगदंबा तिच्या समोर उभी ठाकते. पाहता पाहता पाच-सहा 'जगदंबा' तिच्या आजूबाजूला वर्तुळाकार उभ्या राहतात. मोह घाबरते "हे काय चाललंय? सगळीकडे जगदंबाच?" मग एक एक जगदंबा कवड्यांमध्ये रूपांतरित होते, आणि त्या अनेक कवड्यांमधून प्रकट होते तुळजाभवानी देवी.
हे रूप पाहून मोह अजूनच अस्थिर होते. पण त्या तेजस्वी कवड्या तिच्यावर झेप घेतात. मोह धडपडते. तिचं रूप विद्रूप होतं... जखमा, चेहऱ्यावर खड्डे… आणि त्या कवडीपैकी एक आरशात बदलते. मोह तिथे स्वतःचं विद्रूप रूप पाहते आणि जीवाच्या भीतीने किंचाळते. तुळजाभवानी मोहरुपी मोहिनीला बजावते "फक्त रूप असून चालत नाही… तेज हवं जे आतून येतं… आणि अंधार नष्ट करतं!" आता आई तुळजाभवानी मोहरूपी मोहिनीचा विनाश कशी करणार ? तिच्या पापांचा हिशोब कसा चुकता करणार हे बघणे रंजक ठरणार आहे.