Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रात्रीस खेळ चाले' फेम सरिताचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 16:18 IST

Prajakta Wadaye : 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत सरिताच्या भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता वाड्ये घराघरात पोहचली आहे. ती आता छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chaale) मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ही मालिका बंद झाली असली तरी अजूनही या मालिकेनं आणि पात्रांचे रसिकांच्या मनातील घर कायम आहे. या मालिकेत सरिताच्या भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता वाड्ये (Prajakta Wadaye) घराघरात पोहचली आहे. ती आता छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. ती सन मराठी वाहिनीवरील क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मालिकेत झळकणार आहे.

श्री देव वेतोबाची कथा मांडणारी क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ही आणखी एक नवी मालिका सन मराठीवर दाखल होत आहे. १७ जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्री देव वेतोबाची गोष्ट अनुभवयाला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक असतीलच, पण नव्या मालिकेच्या माध्यमातून कलाकारांना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळण्याचा आनंदही त्यांना होत असतो. अभिनेता उमाकांत पाटील हा या मालिकेचा प्रमुख चेहरा आहे जो ‘वेतोबा’ची भूमिका साकारणार आहे. पण त्यासह, आणखी कोणते कलाकार या मालिकेत पाहायला मिळणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली असतानाच आणखी एका प्रमुख पात्राची ओळख  वाहिनीने करुन दिली आहे. 

सोमिल क्रिएशन प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत, सुनील भोसले निर्मित क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मालिकेचे दिग्दर्शन नितिन काटकर यांनी केले असून निलेश मयेकर यांनी कथा लिहिली आहे तर राजेंद्रकुमार घाग यांनी पटकथा आणि महाबळेश्वर नार्वेकर यांनी संवाद लिहिले आहेत. मालवणी भूमिका अतिशय चोखपणे पार पाडणारी, कोकणचा चेडू आणि गुणी अभिनेत्री प्राजक्ता वाडये क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेत प्राजक्ता ‘बायो’ या पात्राच्या भूमिकेत दिसेल. 

प्राजक्ता साकारणार बायोची भूमिका

प्राजक्ताने अनेक मराठी मालिका आणि सिनेमांत काम केले आहे. तिने साकारलेल्या भूमिका इतक्या लोकप्रिय झाल्या की प्राजक्ता हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलं. क्षेत्रपाल श्री देव वेतोबामालिकेतील प्राजक्ताचं ‘बायो’ हे मालवणी पात्रं देखील लोकप्रिय ठरेल यात शंका नाही. आता बायो हे पात्रं सकारात्मक आहे की नकारात्मक याचा अंदाज प्रेक्षकांना येईलच, पण हे मात्र नक्की की, प्राजक्ताच्या या भूमिकेमुळे मालिकेचे प्रत्येक भाग रंजक वळणावर पोहोचणार आहेत.