Join us

नाशिकच्या गोदा आरतीमध्ये तल्लीन झाले 'सावली होईन सुखाची'चे कलाकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:06 IST

'सावली होईन सुखाची' (Savali Hoin Sukhachi) या मालिकेच्या नव्या पर्वात राधा म्हणजेच बिट्टी व विराजस यांची मैत्री फुलत असलेली पाहायला मिळते.

सन मराठीवरील 'सावली होईन सुखाची' (Savali Hoin Sukhachi) या मालिकेच्या नव्या पर्वात राधा म्हणजेच बिट्टी व विराजस यांची मैत्री फुलत असलेली पाहायला मिळते. पण आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. राधा आणि विराजस यांच्या मैत्रीत एक वेगळे वळण येणार आहे. घरचा बिझनेस आणि वडिलांच्या अटी यामुळे विराजसला सतत बिट्टीबरोबर राहता येणार नाही. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. राधाची मिसळ लोकांपर्यंत पोहोचवण्याची नवीन कल्पना तिला देऊन, तिचा बिझनेस वाढवा यासाठी विराजस मदत करत आहे. यामुळे दोघांची मैत्री अधिक घट्ट होताना दिसत आहे. 

नुकतेच मालिकेचा एक भाग नाशिक येथील गोदावरी घाट येथे शूट झाला. नाशिकच्या गोदा आरतीचा मान कलाकारांना मिळाला. या आरतीसाठी भाविकांची तुफान गर्दी होते. त्यामुळे मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांनाही ही महाआरती पाहण्याचा योग येणार आहे. ही आरती पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर दिसणार असल्याने प्रेक्षकांना वेगळी उत्सुकता आहे. 

मालिकेत अभिनेता अमेय बर्वे व अभिनेत्री प्रतिक्षा पोकळे मुख्य भूमिका साकारत आहेत. प्रतिक्षा पोकळेने गोदा आरतीचा अनुभव शेअर केला. अभिनेत्री म्हणाली की, "मालिकेच्या निमित्त गेले काही महिने आम्ही या शहरात राहतोय, पण यापूर्वी गोदा घाटावर जाण्याचा योग आला नव्हता. हा भाग शूट करण्यासाठी म्हणून मी तिथे गेले आणि तो अनुभव खूप वेगळा होता.  तिथे येणारे भाविक तल्लीन होऊन या आरतीचा अनुभव घेत होते. खरंच त्या ठिकाणी जाऊन मनाला शांतता आणि काम करण्याची नवी ऊर्जा  मिळाली असं मी म्हणेन. शूटिंग चालू असताना प्रेक्षकांनी कामाची पोचपावती दिली त्यामुळे हा दिवस न विसरण्यासारखा होता. बीट्टीला कायम वाटत की, विराजस तिच्याबरोबर असावा. यापुढे जशी गोष्ट पुढे जाईल तस राधा आणि विराजस यांचं नातं ही बहरेल."