'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या मालिकेत सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने साकारली आहे. तर अर्जुनची भूमिका अभिनेता अमित भानुशाली(Amit Bhanushali)ने निभावली आहे. दरम्यान आता अभिनेत्याचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांसमोर येणार आहे. अमित एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्यासोबतच त्याला बासरी वादनाची कलाही अवगत आहे. नुकतेच आता होऊ दे धिंगाणामध्ये बासरीवादन करुन त्याने सर्वांचीच मनं जिंकली.
बासरीवादनाची आवड कशी निर्माण झाली याविषयी सांगताना अमित म्हणाला, मी कॉलेजमध्ये असतानाच बासरी वादन शिकलो. पूर्वी आम्ही डोंबिवलीमध्ये रहायचो. तिथे एक स्वामीनारायण मंदिर होते. माझे बऱ्याचदा या मंदिरात जाणे व्हायचे. या मंदिरात महापुरुषदास स्वामींचे बासरीवादन पाहून मी तल्लीन होऊन जायचो. खरेतर त्यांचे हे जादुई सूर पाहुनच मलाही बासरी वादनाची आवड निर्माण झाली. मी त्यांच्याकडूनच बासरी वादनाचे धडे गिरवले. महापुरुषदास स्वामी यांनी पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्याकडून ही कला अवगत केली आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्यासोबत मी देखील जायचो.
तर वाद्य तुम्हाला निवडते- अमित भानुशाली
बासरी हे आपले प्राचीन वाद्य आहे. असे म्हणतात की, वाद्याला तुम्ही निवडत नाही. तर वाद्य तुम्हाला निवडते. माझ्यासोबतही काहीसे असेच झाले. मी बरीच वर्ष माझी ही कला जोपासत होतो. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर यात खंड पडला. मात्र स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर मला माझ्या कलेशी भेट घडवून दिली, असे अमित भानुशाली म्हणाला.