'ठरलं तर मग' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रियतेचं शिखर गाठत आहे. या मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी तर प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना दिसतेय. टीआरपीच्या यादीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. ही मालिका नवे वळण घेत असून प्रतिमाची स्मृती परत कधी येणार, मधुभाऊंच्या केसचं काय होणार?, महिपतला शिक्षा होणार का? याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. महिपत या खलनायकाची भूमिका अभिनेते मयूर खांडगे आहेत. रील लाईफमध्ये खलनायक भुमिका साकारणारे मुयर खांडगे हे खऱ्या आयुष्यात मात्र रिअर लाईफ हिरो आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी एक स्तुत्य उपक्रम केलाय.
मुयर खांडगे यांनी नुकतंच 'कृषीथॉन फेस्टिवल २०२४'मध्ये स्वतः सेंद्रिय खतांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहलं, "कृषीथॉन फेस्टिवल २०२४... अभिनय; शेती आणि शेतकरी नेहमीच माझ्या आवडीचा जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय. अभिनय करता-करता शेतकऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी करावं असं नेहमी वाटायचं. पण, नेमकं काय ते कळत नव्हतं. कारण, जे करायचं होतं. ते आज उद्या आणि भविष्यात शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि भविष्यात आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी सुद्धा उपयोगी असेल असं काहीतरी करायचं होतं. त्याचा शोध घेता-घेता माने ग्रो ऍग्रो या कंपनीच्या संपर्कात आलो. या कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी अतिउत्तम अशा प्रतीचे सेंद्रिय खत तयार केलं आहे. रासायनिक खतांच्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना केमिकल वापरायला भाग पाडून शेतकऱ्यांच्या जमिनीचं जे नुकसान केलंय ते अतिशय भयंकर आहे".
पुढे त्यांनी लिहलं, "काही शेतकऱ्यांच्या ते लक्षात आलंय आणि काही शेतकऱ्यांच्या अजूनही ते लक्षात येत नाहीये. कारण, शेतकऱ्याकडे काही गोष्टींना पर्याय नसतो. आणि याचाच फायदा केमिकल कंपन्यांनी घेतला. अशाच भयंकर केमिकल वापरलेल्या जमिनीत तयार होणारा सगळा भाजीपाला तुम्ही, मी आणि आपलं संपूर्ण कुटुंब खातोय आणि त्यातूनच नको तितक्या आजारांना आपण बळी पडतोय. वेळीच सेंद्रिय खताचा वापर करून तयार केलेला शेतीमाल जर आपल्यापर्यंत आला नाही तर याचे परिणाम भविष्यात खूप वाईट होणार आहेत यात शंका नाही".
त्यांनी म्हटलं, "मी माझ्या परीने प्रयत्न करतोय की, हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत कसं जाईल, खतात होणारा शेतकऱ्याचा जास्तीचा खर्च कसा कमी होईल आणि शेतकरी आणि त्याची जमीन कशी टिकेल. त्यासाठी मी हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी घेऊन माझ्यापरीने एक पाऊल पुढे टाकलं आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती की, तुम्ही सुद्धा या उत्तम विचारासाठी मला पाठबळ द्यावं आणि माझी सोबत करावी. या कार्यात यश मिळेल की अपयश याची मला खरंच कल्पना नाही पण हे व्हावं अशी अतिशय मनापासून इच्छा आहे. माझ्या अभिनयावर तुम्ही इतकं मनापासून प्रेम करत आहात तर माझ्या या कार्यासाठी सुद्धा तुम्ही मला सहकार्य कराल अशी आशा बाळगतो. बळीराजाचा विजय असो…#शेतकरी#बळीराजा #mane grow agro". मुयर खांडगे यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्यात.