'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. त्या ६८ वर्षांच्या होत्या. प्रकृती बिघडल्याने गेल्या ३-४ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील का खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची दुपारी ३-४ वाजताच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
याआधी एकदा ज्याोती चांदेकर मृत्यूच्या दाढेतून परत आल्या होत्या. 'ठरलं तर मग'च्या सेटवरच पूर्णा आजी बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दोन महिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं होतं. "आमचं मंगळागौरीची शूटिंग सुरू होतं. मी खूर्चीत बसायला गेले आणि मी बेशुद्धच पडले. माझं सोडियम कमी झालं होतं. त्यानंतर सगळ्यांनी इतकी धावपळ केली. अचानक काय झालं म्हणून सगळेच घाबरले होते. त्यानंतर लगेचच मला त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथून मी बरी होऊन आल्यानंतर पुन्हा जोशात शूटिंग सुरू झालं. परमेश्वर इतका पाठिशी आहे. त्यानंतर आणखी एकदा मी मृत्यूच्या दाढेतूनच परतले होते. पण, तरीही हे सगळे माझ्यासाठी थांबले होते. कुठलेही मालिकावाले एका अभिनेत्रीसाठी दोन महिने थांबत नाहीत. पण, हे सगळे माझ्यासाठी थांबले होते. दोन महिने मी मालिकेत काम करत नव्हते. खरं तर आमच्या सगळ्यांमध्येच एक बॉण्डिंग आहे", असं ज्योती चांदेकर म्हणाल्या होत्या.
ज्योती चांदेकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. २०० हून अधिक पुरस्कार त्यांनी नावावर केले होते. आईच्याच पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनी पंडित हिनेदेखील अभिनयात करिअर करायचं ठरवलं. ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.