'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं शनिवारी(१६ ऑगस्ट) निधन झालं. ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील का खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
पूर्णा आजीच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मधील अनेक सहकलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय पूर्णा आजीसोबतच्या काही खास आठवणीही कलाकारांनी शेअर केल्या. मात्र ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जूनच्या मित्राच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने कोणतीही पोस्ट केली नाही. याबाबत चाहत्यांनी अभिनेत्याला प्रश्न विचारले. पूर्णा आजीच्या निधनानंतर पोस्ट केली नाही म्हणून प्रश्न विचारणाऱ्यांना आता अभिनेत्याने उत्तर दिलं आहे.
चैतन्यने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, "इन्स्टाग्रामवर मी दु:ख व्यक्त का केलं नाही याबाबत तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं. मला हे स्पष्ट करावंसं वाटतं की इन्स्टाग्राम हे माझ्या भावना सांगण्याचं माध्यम नाही. ज्या व्यक्तीला आम्ही गमावलं त्यांच्यासोबतच्या आठवणी, दु:ख आणि त्यांच्यासोबत असलेलं कनेक्शन हे पर्सनल आहे. सोशल मीडियावर पोस्ट केली नाही याचा अर्थ मला फरक पडत नाही असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की मी माझ्या भावना पर्सनल ठेवू इच्छितो. त्या भावना माझ्या सोशल मीडियावर दिसत नसल्या तरी हृदयात आहेत".
ज्योती चांदेकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. २०० हून अधिक पुरस्कार त्यांनी नावावर केले होते. आईच्याच पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनी पंडित हिनेदेखील अभिनयात करिअर करायचं ठरवलं. ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर रविवारी(१७ ऑगस्ट) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.