सिनेमा असो किंवा वेबसीरिज कलाकार एखाद्या भूमिकेसाठी खऱ्या आयुष्यातही अनेक बदल करुन घेतात. भूमिकेची गरज म्हणून ते अक्षरश: जीव ओतून काम करतात. शारिरीक असो किंवा मानसिक दोन्हीवर याचा परिणाम होतो. डाएट करुन वजन वाढवणं किंवा घटवणं हे तर त्यांच्यासाठी नेहमीचंच असतं. शिवाय स्वत:च्या लूककडेही त्यांना लक्ष द्यावं लागतं. नुकतंच एका टीव्ही अभिनेत्रीने भूमिकेसाठी टक्कल करण्याचीही तयारी असल्याचं म्हटलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
'बिग बॉस सीझन १५' ची विजेती तेजस्वी प्रकाशने (Tejasswi Prakash) नुकतीच हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, " मी नेहमीच माझ्या कामात कमिटेड राहिली आहे. जर एखाद्या भूमिकेची किंवा कथेचीच तशी गरज असेल तर मी टक्कलही करेन. आजकाल ब्युटी क्षेत्रात बरेच पर्यायही आले आहेत. आपल्या केसांचा खास रंग दाखवण्यापासून ते तुम्हाला बाल्ड किंवा अगदी गोरं दाखवण्यापर्यंतचे उपाय उपलब्ध आहेत. मला आजपर्यंत कोणी यापैकी काहीही करायला सांगितलेलं नाही. पण जर कधी कोणी विचारलं तर मी नक्की करेन."
आपल्या हेअरकेअर रुटीनबद्दल तेजस्वी म्हणाली, "माझ्या हेअरकेअरमध्ये माझ्या आईचाच जास्त सहभाग आहे. ती मला आजही केसांना तेल लावून मसाज करुन देते. प्रॉपर हेअरवॉशनंतर मी ५-१० मिनिटांसाठी हेअरमास्क लावते. त्यानंतर सीरम लावते. हेअरकेअर हा माझ्या डेली रुटीनचाच भाग आहे."
तेजस्वी सध्या आगामी प्रोजेक्टसाठी वजन घटवत आहे. बिग बॉस १५, खतरो के खिलाडी १० आणि सेलिब्रिटी मास्टरशेफ या रिएलिटी शोजमध्ये तेजस्वी दिसली आहे. 'स्वरागिनी','जोडे रिश्तो के सूर' या मालिकांमध्येही ती दिसली आहे.
तेजस्वी काही वर्षांपासून अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. बिग बॉस १५ मध्येच त्यांची ओळख झाली. ते प्रेमात पडले. गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. तेजस्वी आज एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिचा गोवा आणि दुबईतही फ्लॅट आहे. मुंबईत स्वत:चं घर आहे. आता करणसोबत ती कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.