अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) झी मराठीवरील आगामी 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो आला. वयाची चाळीशी ओलांडलेल्या समरसोबत तिशी चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेली स्वानंदी लग्नगाठ बांधते. दोघंही आपल्या भावाबहिणीच्या सुखासाठी हे लग्न करतात अशी मालिकेची कथा असणार आहे. खऱ्या आयुष्यात तेजश्रीचं लग्नसंस्थेवर काय मत आहे यावर तिने नुकतंच भाष्य केलं.
लग्नाआधी दोघांची पत्रिका पाहायलाच हवी का? यावर 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत तेजश्री प्रधान म्हणाली, "हे व्यक्ती व्यक्तींवर अवलंबून आहे. ज्याला जे वाटतंय त्याने ते करावं. जर कोणाला बघावीशी वाटतच असेल तरीही मला वाटतं की आपल्या पूर्वजांनी, ऋषी मुनींनी त्या मागे काही शास्त्र लिहून ठेवली आहेत. त्यामुळे पत्रिकेतले गूण जुळणं न जुळणं हे आपल्या स्वभावाला धरुन किंवा आपल्या जन्मासकट येणाऱ्या गोष्टींबरोबरच्या असतात. त्यामुळे खबरदारी म्हणून पाहा पण पत्रिका तुमचं आयुष्य ठरवणार नाही. ते शेवटी आपल्याला त्यासाठी सतत कष्ट घ्यावे लागणार आहेत.
ती पुढे म्हणाली, "मला रुढी परंपरा फॉलो करायला आवडतात. माझा किती विश्वास आहे किंवा नाही आहे त्यापेक्षा आपल्या मोठ्या लोकांनी जर काही सांगून ठेवलेलं आहे आणि ते करुन आपलं काही नुकसान होणार नसेल तर मग करायला काय हरकत आहे.
लग्न कधी करावं?
तेजश्री म्हणाली, "जसं जसं वय वाढतं तसं तसं तुम्ही तुमच्याच सहवासात जास्त राहत असता. स्वतंत्र होत जाता. मग दुसऱ्यासोबत राहण्यासाठी स्वत:मध्ये बदल करण्याची तुमची इच्छा कमी कमी होत जाते. त्यामुळे वेळेत लग्न उरकण्यामागे हेच लॉजिक असेल की तुम्हाला समोरच्या व्यक्तीसोबत बेस्ट अॅडजस्टमेंट करता येईल. ती ज्याच्याबरोबर होईल त्या व्यक्तीबरोबर तुम्ही सेटल होता. वय वाढत जातं तसं ती अॅडजस्टमेंट कमी व्हायला लागते. त्यामुळे वेळेत झालेलं बरं असं म्हणतात. "