Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत टाकला जाणार शिक्षणव्यवस्थेवर प्रकाशझोत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 11:59 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच कोणत्या ना कोणत्या सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला जातो. आता आणखी एक ...

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच कोणत्या ना कोणत्या सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला जातो. आता आणखी एक सामाजिक प्रश्न या मालिकेत मांडला जाणार आहे. सध्या अनेक शाळांमध्ये मुलांना प्रवेश देण्याआधी त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती पाहिली जाते तसेच मुलांच्या पालकांची मुलाखतदेखील घेतली जाते. मुलाखतीत पालक पास झाल्यानंतरच मुलांना प्रवेश दिला जातो. आपल्या शाळेत शिकणारी मुले ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असावीत आणि त्यांचे पालक शिक्षीत असावेत असा यामागचा हेतू असतो. पण या सगळ्यात पालकांची परिस्थिती नसल्यास अथवा पालक शिक्षीत नसल्यास मुलांनी चांगल्या शाळेत प्रवेश घेऊच नये का हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित राहातो. याच महत्त्वाच्या मुद्द्यावर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत आता प्रकाशझोत टाकला जाणार आहे. या मालिकेदेवारे शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या भेदभावाविषयी भाष्य केले जाणार आहे. तसेच मुलींसाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हादेखील मुद्दा याद्वारे अधोरेखित केला जाणार आहे. गोकुळधाम सोसायटीत भाजी विकणारी बाई आपल्या मुलीला घेऊन भाजी विकायला येते. त्यावर तू आईसोबत का आली आहेस, शाळेत का जात नाहीस? हा प्रश्न गोकुळधामवासियांना पडणार आहे आणि शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे. तिला शाळेत पाठवा असे तिच्या आईला ते सांगणार आहेत. पण भाजीवाली आणि तिचा नवरा कमी शिकल्याने त्यांच्या मुलीला शाळेत प्रवेश मिळत नसल्याचे ती भाजीवाली त्यांना सांगणार आहे. एवढेच नव्हे तर त्या मुलीला प्रवेश दिल्यास शाळेचा दर्जा ढासळेल असेदेखील शाळेतल्यांचे म्हणणे असल्याचे गोकुळधामवासियांना ती भाजीवाली सांगणार आहे. त्यामुळे यावर आता गोकुळधामवासिय काय करतात हे पाहाणे मनोरंजक ठरणार आहे. या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारा दिलीप जोशी शिक्षण क्षेत्रातील या भेदभावाविषयी सांगतो, "शिक्षा घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे अशाप्रकारे भेदभाव करणे हे अतिशय चुकीचे आहे. आतापर्यंत नेहमीच आम्ही अनेक सामाजिक मुद्दे मालिकेत मांडले आहेत. आतादेखील प्रेक्षकांना असाच एक सामाजिक मुद्दा मालिकेत पाहायला मिळणार आहे."