Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत पिंकूने का फाडला भिडेचा कुर्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 16:51 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षं सुरू असली तरी या मालिकेत अनेक प्रश्न आजही प्रेक्षकांना ...

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षं सुरू असली तरी या मालिकेत अनेक प्रश्न आजही प्रेक्षकांना सतावत आहेत. या मालिकेतील पोपटलालचे लग्न कधी होणार, तसेच पिंकूचे पालक कोण आहेत या प्रश्नांची उत्तरं आजही प्रेक्षकांना मिळालेली नाहीत. पण पिंकूचे पालक कोण आहेत याचा आता शोध टप्पूसेना घेणार आहेत. पिंकू आपल्या पालकांविषयी काहीतरी लपवत आहे हे टप्पूसेनाच्या लक्षात आले आहे आणि त्यामुळे त्याचे घर शोधण्यासाठी त्यांनी पिंकूचा पाठलाग देखील केला. पण या सगळ्यांची दिशाभूल करत पिंकू निघून गेला. पिंकूच्या आईवडिलांचा शोध टप्पूसेना घेत आहे हे कळल्यावर भिडेने देखील त्यांना मदत करण्याचे ठरवले आहे. पण ही मदत भिडेच्याच अंगाशी आली आहे. पिंकूला शोधता शोधता भिडे एका दुसऱ्याच पिंकूच्या घरात पोहोचला आहे. पण हा पिंकू चांगलाच मस्तीखोर आहे आणि त्यामुळे त्याने रागाच्या भरात भिडेचा कुर्ताच फाडून टाकला आहे. त्यामुळे घाबरलेला भिडे घरी परतला आहे. टप्पूने भिडेसोबत घडलेली सगळी गोष्ट बापूजींना सांगितली आहे. त्यावर पिंकूचे पालक शोधण्यात कोणतीही घाई करू नका असा सल्ला बापूजीने टप्पूला दिला आहे. त्यामुळे बापूजींचे ऐकून आता टप्पूसेना पिंकूच्या वडिलांना शोधण्यासाठी एक प्लानच आखणार आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल, बाघा, नट्टू काका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेला आज आठ वर्षांहून अधिक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.