Join us

मुनमुन दत्ता आयुष्यात संकटांचा काळ; सतत घालतेय रुग्णालयाच्या चकरा, नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 10:42 IST

मुनमुन दत्ता सध्या कठीण प्रसंगातून जात आहे.

Munmun Dutta: मुनमुन दत्ता ही टीव्ही इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे.  लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. प्रेक्षकांना तिचा अभिनय खूप आवडतो. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मुनमुन दत्ता तिच्या करिअरमध्ये प्रोफेशनल लाईफपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. ती सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुनमुन ही सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नाहीये. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली होती. अखेर सोशल मीडियापासून दूर राहण्यामागचं कारण तिने स्वतः उघड केलं आहे. नुकत्याच केलेल्या पोस्टमधून तिने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बबिता अय्यर ही भुमिका गाजवणारी मुनमुन दत्ता सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. आईच्या प्रकृतीमुळे मुनमुन सोशल मीडियापासून दूर आहे. मुनमुन दत्ताने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना सांगितलं की, तिच्या आईची तब्येत बराच काळ ठीक नाही. आई रुग्णालयात दाखल असून, गेल्या १० दिवसांपासून ती सतत रुग्णालयाच्या चकरा मारत आहे.

अभिनेत्रीने लिहिलं, "हो, मी बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर सक्रिय नाही. माझ्या आईची तब्येत ठीक नाही आणि मी गेल्या १० दिवसांपासून रुग्णालयाच्या फेऱ्या मारत आहे. आता तिची प्रकृती सुधारत आहे आणि ती लवकरच बरी होईल".

अभिनेत्रीने तिच्या आजारी आईची काळजी घेणे आणि व्यावसायिक काम करताना येणाऱ्या आव्हानांबद्दलही सांगितले. मुनमुन म्हणाली, "व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक जीवन संतुलित करणे खूप थकवणारे आहे, परंतु मी माझ्या मित्रांची आभारी आहे, त्यांनीच मला या काळात खूप पाठिंबा दिला आहे. देवाची कृपा आहे", असं तिनं म्हटलं. मुनमुनच्या या कठीण काळात तिचे चाहते आणि सहकलाकार तिच्या पाठीशी उभे आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या आईचं आरोग्य सुधारण्याच्या शुभेच्छा दिल्यात. 

टॅग्स :मुनमुन दत्तातारक मेहता का उल्‍टा चश्‍मासोशल मीडिया