Join us

स्वामी ओम, हाजीर हो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 19:58 IST

दिल्लीच्या एका न्यायालयाने बिग बॉसमध्ये चर्चेत असलेल्या स्वामी ओम यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे. त्यांच्या भावाकडून त्यांच्यावर दाखल केलेल्या ...

दिल्लीच्या एका न्यायालयाने बिग बॉसमध्ये चर्चेत असलेल्या स्वामी ओम यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे. त्यांच्या भावाकडून त्यांच्यावर दाखल केलेल्या चोरीच्या आरोपाअंतर्गत न्यायाधीश सतीश कुमार यांनी तीन डिसेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांची जमानत रक्कमही जप्त केल्याने, त्यांना न्यायालयात हजर राहण्याखेरीज पर्याय नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावेळी न्यायालयाने स्वामी ओम यांच्या अनुपस्थितीवरून पोलिसांना फटकारताना म्हटले की, वेळोवेळी आदेश देवूनही आरोपी अद्यापपर्यंत न्यायालयात उपस्थित झाला नाही. १४ आॅक्टोंबर २०१६ रोजी आदेश देवूनही आरोपी गैरहजर होता. त्यामुळे आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी वॉरंट काढण्यात आले आहे. दरम्यान ८ नोव्हेंबर रोजी आरोपी स्वामी ओम यांच्या वकिलांकडून काही दिवसांच्या मुदतीसाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. अर्ज फेटाळल्यानंतर ते २१ नोव्हेंबरला न्यायालयात नक्कीच उपस्थित होतील अशा आशयाचा अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावेळेस देखील आरोपी हजर राहिला नसल्यानेच अटक वॉरंट काढण्यात आले आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये विनोदानंद झा ऊर्फ स्वामी ओम यांच्याविरोधात त्यांचा भाऊ प्रमोद झा यांनी ११ सायकल चोरल्या असल्याच्या त्यांच्यावर आरोप लावला होता. सध्या बिग बॉसच्या घरात स्वामी ओम हे सर्वाधिक चर्चेत राहणारे स्पर्धक असून, ते न्यायालयात उपस्थित राहणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.