Join us

सुरुची अडारकर एक घर मंतरलेलं मध्ये साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 19:18 IST

एक घर मंतरलेलं मध्ये सुरुची अडारकर एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत ती सुयश टिळकसोबत झळकणार आहे.

ठळक मुद्देसुरुचीने साकारलेले मालिकेतील  रिपोर्टर गार्गी महाजन हे पात्र, बिनधास्त आणि बेधडक आहे. जे सत्याच्या शोधात असतं. मात्र  खऱ्या आयुष्यात कोणत्याही भयावह गोष्टींची तिला भीती वाटत असल्याचे तिने गप्पांमध्ये सांगितले.

घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाचं ओढून घेतं. हे वाक्य जेवढं गूढ आहे तशीच झी युवा वाहिनीवर नुकतीच प्रदर्शित झालेली मालिकासुद्धा आहे. या आगळ्यावेगळ्या विषयावरील मालिकेचा लॉन्चदेखील तसाच निराळ्या पद्धतीने नुकताच पार पडला.

'एक घर मंतरलेलं' या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले सुरुची अडारकर आणि सुयश टिळक यांच्या उपस्थितीत बॉनफायरचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील थंडी अजूनही पळाली नसली, तरी या बॉनफायरचं कारण मात्र वेगळं होतं. नेहमी आगळे विषय घेऊन येणाऱ्या 'झी युवा' या वाहिनेने, प्रेस कॉन्फरन्सची नियमित पद्धत बाजूला ठेवत, एक नवा प्रयोग केला. मीडियामधील मंडळी आणि मालिकेचे कलाकार यांच्या गप्पांच्या माध्यमातून ही प्रेस कॉन्फरन्स झाली. सुयश आणि सुरुचीच्या मीडियामधील मित्रमंडळींनीसुद्धा या खास प्रेस कॉन्फरन्सला हजेरी लावली. गप्पा, मजामस्ती आणि बॉनफायर यांनी भरलेली एक धमाल संध्याकाळ असे या प्रेस कॉन्फरन्सचे स्वरूप होते.

सुरुचीने साकारलेले मालिकेतील  रिपोर्टर गार्गी महाजन हे पात्र, बिनधास्त आणि बेधडक आहे. जे सत्याच्या शोधात असतं. मात्र  खऱ्या आयुष्यात कोणत्याही भयावह गोष्टींची तिला भीती वाटत असल्याचे तिने गप्पांमध्ये सांगितले. शूटिंगच्या निमित्ताने ही भीती निघून जाईल, असेही सांगायला ती विसरली नाही. आपल्याला आलेले भीतीदायक अनुभव, भुताखेतांवरील विश्वास आणि अविश्वास यावरही सगळ्यांच्या गप्पा रंगल्या. अभिनेता सुयश टिळकने त्याच्या ओळखीच्या लोकांचे काही भीतीदायक अनुभव कथन केले. सुहृद वार्डेकर या मालिकेत रिपोर्टर गार्गीच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. तो सुद्धा या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होता आणि त्यानेही काही किस्से सगळ्यांना ऐकवले.

एका अनोख्या प्रकारे लॉन्च करण्यात आलेली ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची ठरेल याची खात्री मालिकेच्या टीमला आहे. ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार झी युवा वाहिनीवर रात्री ९.३० वाजता पाहायला मिळणार आहे. 

या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे सुरुची आणि सुयश अनेक वर्षांनंतर या मालिकेच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. 

टॅग्स :सुयश टिळक