Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश वाडकर यांची कन्या अनन्या गाणार सरगममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 17:23 IST

सुरेश वाडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, तमीळ, कन्नड यांसारख्या अनेक भाषांमध्ये ...

सुरेश वाडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी गायली आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, तमीळ, कन्नड यांसारख्या अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मेघा रे मेघा रे, ए जिंदगी गले लगा रे ही त्यांनी गायलेली हिंदी चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली आहेत. तसेच त्यांनी तुला पाहिले मी, हे भास्करा क्षितिजावरी या, पाहिले न मी तुला या गायलेल्या मराठी गाण्यांनीदेखील रसिकांच्या मनावर भुरळ घातली आहे. त्यांची पत्नी पद्मा या देखील क्लासिकल सिंगर आहेत. त्यांनीदेखील अनेक गाणी गायली असून त्या सध्या सारेगमपा या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. सुरेश वाडकर आणि त्यांच्या पत्नीनंतर आता त्यांची मुलगी अनन्यादेखील या क्षेत्रात येण्यासाठी सज्ज झाली आहे. सरगम हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला असून या कार्यक्रमात अनेक नवीन गायकांना संधी देण्यात आली आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक, संगीतकार आपली गाजलेली मराठी चित्रपटातील, अल्बममधील गाणी सादर करतात आणि त्यानंतर ते नव्या टायलेंटला लोकांच्यासमोर आणण्यासाठी नवीन मुलांसोबत गाणी गातात. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये शंकर महादेवन यांनी उपस्थिती लावली होती आणि आता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये सुरेश वाडकर येणार आहेत. सुरेश वाडकर त्यांची गाजलेली गाणी गाणार आहेत आणि त्यानंतर नवीन टायलेंट म्हणून त्यांच्या आजीवासनमधील दोन शिष्यांसोबत गाणार आहेत आणि त्यातील एक शिष्या दुसरी कोणीही नसून सुरेश वाडकर यांची मोठी मुलगी अनन्या आहे. त्यामुळे आता सुरेश वाडकर यांची पुढची पिढी इंडस्ट्रीत येण्यासाठी सज्ज झाली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.