Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुंदरी'ला तिच्या सासरच्यांकडून मिळाला बाप्पाची स्थापना करण्याचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 09:21 IST

Sundari Serial : ‘सुंदरी’ मालिकेच्या निमित्ताने स्त्रीला ही समाजाचा घटक म्हणून विशिष्ट असे अधिकार मिळायला हवे या मुद्यावर अनेकदा लक्ष घालण्यात आले.

गेले कित्येक वर्षे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. प्रत्येक कामात पुरुषांसह आता स्त्री देखील अग्रेसर आहे. स्त्री-पुरुष यांच्यात भेदभाव न होता दोघांनाही समान हक्क मिळावा यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आणि त्याला काही प्रमाणात यश देखील मिळाले. ‘सुंदरी’ मालिकेच्या निमित्ताने स्त्रीला ही समाजाचा घटक म्हणून विशिष्ट असे अधिकार मिळायला हवे या मुद्यावर अनेकदा लक्ष घालण्यात आले.

गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत सर्वजण मग्न झालेले आहेत. प्रत्येकासाठी गणेशोत्सव हा खूप खास असतो, मग ती व्यक्ती लहान असो किंवा वयस्कर, मुलगा असो किंवा मुलगी, माहेरचा गणपती असो किंवा सासरचा, आनंद तोच असतो. विशेष म्हणजे, बाप्पा आणतात आणि जेव्हा स्थापना केली जाते तेव्हा कित्येक मुलींना असं वाटत असतं की बाप्पाची स्थापना त्यांच्या हस्ते व्हावी, पण अजूनही समाजात काही ठिकाणी पुरुषांनीच स्थापना करावी असा समज आहे. काही प्रगतीशील शहरांत मात्र मुलींना हा अधिकार देखील देण्यात आलेला आहे, त्यामुळे मुलींचा आनंद गगनात मावेना असा असतो. पण आनंद आणि समाधान तेव्हा द्विगुणित होतो जेव्हा मुलीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सुध्दा सांगण्यात येतं की, “बाप्पाची स्थापना तू कर म्हणून”. हाच नाजूक विषय सन मराठीने ‘सुंदरी’ या मालिकेत अतिशय सुंदर पध्दतीने हाताळला आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात एक सुरेख विचार ‘सन मराठी’ वाहिनीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात रुजवलेला आहे, आता या विचारांचं सुंदर झाड लवकरच होईल आणि प्रत्येक मुलीला बाप्पाची स्थापना करण्याचा अधिकार नक्की मिळेल, असा विश्वास वाटतो. येत्या आठवड्यात पाहा ‘सुंदरी’ मालिका, रात्री १० वाजता फक्त ‘सन मराठी’वर.