मनोरंजन विश्वात एक नवीन मालिका सुरु होणार आहे. 'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अशोक फळदेसाई या नव्या मालिकेत दिसणार आहे. 'सन मराठी' वाहिनीवर लवकरच 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' या नव्या मालिकेतून एका नव्या प्रेमकथेचा रोमांचक प्रवास सुरु होतोय. पहिल्या नजरेतल्या प्रेमाची नाजूक, निरागस आणि मनाला स्पर्श करणारी एक अनोखी कहाणी या मालिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.
नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी या प्रोमोला भरभरून, उत्स्फूर्त, सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तेजा (अभिनेता अशोक फळदेसाई) आणि वैदेही (अभिनेत्री अनुष्का गीते) ही जोडी अनुक्रमे नायक नायिकेच्या रुपात या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पहिल्या नजरेतलं प्रेम खूप वेगळंच असतं. जिच्यावर प्रेम जडलंय तिला अंदाजही नसताना त्या व्यक्तीसाठी झुरत राहण्यात देखील मन आनंदी असतं. तेजाचं सुद्धा असंच काहीसं झालेलं आहे. तो पहिल्या नजरेत वैदेहीच्या प्रेमात पडला पण वैदेहीला या गोष्टीची अजिबात कल्पना नाही. तेजाच्या प्रेम व्यक्त करण्याच्या रांगड्या आणि अनोख्या पद्धतीमुळे वैदेहीच्या मनात गैरसमज निर्माण होतो पण मालिका पाहणारी तरूण मात्र नक्कीच फिदा होईल. जिद्दी, प्रेमळ, बंडखोर पण मनाने अत्यंत सच्चा अशा विरोधाभासाने भरलेला तेजा आणि ठाम, आत्मविश्वासू आणि बेधडक वैदेही असा प्रेमाचा हा सामना रंगणार आहे.
प्रोमोमध्ये तेजाचं रांगडं व्यक्तिमत्त्व, आणि वैदेहीच्या प्रेमासाठी त्याची धडपड पाहून प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. अशोक फळदेसाई या भूमिकेत नव्या लूक आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्ससह समोर येत असून त्याचं हे रुप पाहून सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे, त्याच बरोबरीने अभिनेत्री वैदहीच्या भूमिकेत एका सशक्त, ठाम आणि बोलक्या स्वभावाच्या तरुणीच्या रूपात प्रेक्षकांची मनं जिंकायला अभिनेत्री अनुष्का गीते सज्ज आहे. लवकरच प्रेक्षकांना प्रेमाची नवीन परिभाषा 'तुझ्यासाठी तुझ्यासंग' मालिकेतून पाहायला मिळणार आहे.