Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आजारी आईसाठी भंडारा मागितला आणि...'; 'बाळूमामा'फेम अभिनेत्याने सांगितला चाहत्याचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 11:15 IST

Sumit pusavale: बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेत सुमितने साकारलेल्या भूमिकेमुळे अनेक जण त्याला खरोखर बाळूमामांचं रुप समजू लागले होते.

'बाळूमामाच्या नावाने चांगभलं' या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे सुमित पुसावळे (sumit pusavale). या मालिकेमध्ये बाळूमामांची भूमिका साकारुन सुमितने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी मालिकेच्या सेटवर चाहते तुफान गर्दी करायचे. परंतु, या चाहत्यांमध्ये त्याला एक व्यक्ती अशी भेटली जी कायमस्वरुपी त्याच्या स्मरणात राहिली. अलिकडेच सुमितने या चाहत्याचा किस्सा शेअर केला.

बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेत सुमितने साकारलेल्या भूमिकेमुळे अनेक जण त्याला खरोखर बाळूमामांचं रुप समजू लागले होते. त्यामुळे सेटवर चाहत्यांपेक्षा भक्तांचीच जास्त गर्दी व्हायची. अनेक चाहते सुमितला बाळूमामा म्हणून नमस्कार करायचे, त्याच्या पाया पडायचे. परंतु, त्याचा एक चाहता बाळूमामांच्या श्रद्धेपोटी चक्क कोल्हापूरवरुन सुमितला भेटायला आला होता. इतकंच नाही तर त्याने त्याच्या आजारी आईसाठी सुमितकडे भंडाराही मागितला होता.

"मालिकेच्या सेटवर एक बापलेकाची जोडी मला भेटायला आली होती. त्यांनी माझ्याकडे त्यांच्या आजारी आईसाठी भंडारा मागितला. कोल्हापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर आदमापूरला बाळूमामांचं देवस्थान आहे. पण, त्या ठिकाणी ते न जाता मुंबईला मला भेटायला आले. माझं शूट संपल्यावर मला कोणीतरी भेटायला आलंय असं सांगण्यात आलं. मला वाटलं नेहमीप्रमाणे एखादा चाहता असेल त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो. पण, मला पाहताचक्षणी त्यांनी माझे पाय धरले", असं सुमित म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "माझे पाय धरताच ते रडायला लागले आणि माझी बायको खूप आजारी आहे. तुम्ही तुमच्या हाताने भंडारा द्या म्हणजे तिला नक्की बरं वाटेल असं ते म्हणाले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. त्यांच्या या बोलण्यामुळे आपली भूमिका लोकांपर्यंत किती खोलवर गेली आहे याची पावती मला मिळाली.  मला भेटण्यासाठी ते रात्रभर स्टेशनवर थांबले आणि मला भेटले."

दरम्यान, बाळूमामा या भूमिकेमुळे सुमित घराघरात पोहोचला. परंतु, यापूर्वी त्याने लागीरं झालं जी या मालिकेतही काम केलं होतं. मात्र, त्याला खरी ओळखल बाळूमामाच्या नावने चांगभलं या मालिकेमुळे मिळाली.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी