Join us

​आगळेवेगळे कथानक असलेले एक विवाह ऐसा भी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 12:10 IST

एक विवाह ऐसा भी या मालिकेत प्रेक्षकांना एक खूपच वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे क्योंकी साँस भी ...

एक विवाह ऐसा भी या मालिकेत प्रेक्षकांना एक खूपच वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे क्योंकी साँस भी कभी बहू थी फेम तस्नीम शेख नऊ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतली आहे. तस्नीम लग्न झाल्यानंतर लग्न आणि मुलीमध्ये रमली. त्यामुळे तिने अभिनयापासून दूर राहाणेच पसंत केले होते. एक विवाह ऐसा भी या मालिकेची संकल्पना ही सध्याच्या मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. त्यामुळे एका चांगल्या मालिकेद्वारे मी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे याचा मला आनंद होत असल्याचे तिने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. या मालिकेत प्रेक्षकांना 24 वर्षांच्या सुमनची कथा पाहायला मिळणार आहे. सुमनच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती तिची सासू आणि दोन लहान नणंदासोबत राहते. तसेच तिला एक चार वर्षांचा मुलगादेखील आहेत. तिच्या सासूने दिलेल्या पाठिंब्यामुळे ती पतीच्या निधनानंतर एमबीए करण्याचा विचार करते. घर, कॉलेज या गोष्टी सांभाळत असताना तिची चांगलीच तारांबळ उडली आहे. तरीही ती सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करतेय. पण या सगळ्यात रणवीर हा तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा तिचा मित्र तिला लग्नाची मागणी घालतो. घरातल्यांच्या सांगण्यावरून ती त्याच्याशी लग्न करते. पण यामुळे तिच्या आयुष्यात आणखी एक सासू येते. आता या दोन सासूंचा ती सांभाळ कशाप्रकारे करते हे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच एकेकाळच्या तिच्या नणंदा दुसऱ्या लग्नानंतर आता तिच्या जावा बनल्या आहेत. त्यामुळे यात ती कशाप्रकारे स्वतःला सांभाळून घेते हे पाहाण्यासारखे आहे. या मालिकेत काम करण्यासाठी सध्या तस्नीम खूपच खूश आहे. तर या मालिकेत तस्नीमसोबतच हिमानी शिवपुरी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेतली सासू प्रेक्षकांना प्रचंड भावेल अशी हिमानी यांना खात्री आहे.