सबसे बडा कलाकार मालिकेच्या सेटवर आला खास पाहुणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 17:27 IST
सबसे बडा कलाकार या मालिकेत एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स लहान मुले देत असून त्यांचे परफॉर्मन्स पाहून रवीना टंडन, अर्शद ...
सबसे बडा कलाकार मालिकेच्या सेटवर आला खास पाहुणा
सबसे बडा कलाकार या मालिकेत एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स लहान मुले देत असून त्यांचे परफॉर्मन्स पाहून रवीना टंडन, अर्शद वारसी आणि बोमन इराणी त्यांचे कौतुक करत आहेत. प्रत्येक कलाकारामध्ये अभिनय, नृत्य आणि नाट्याची प्रतिमा ठासून भरलेली आहे. छोटे छोटे स्पर्धक आपल्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगले परफॉर्मन्स देत आहेत. या मालिकेच्या सेटवर अलीकडे एक खास पाहुणा आला होता. हा पाहुणा त्याच्या खऱ्या आयुष्यात स्टार असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. श्रेयस हा एक लहान मुलगा प्रोजेरिया या विकाराने गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आहे. या आजारात लहान मुलगा झपाट्याने म्हातारा होत जातो. श्रेयसला देखील हा आजार आहे. पण त्याला त्याची कसलीच भीती नाहीये. या कार्यक्रमात आल्यावर प्रचंड आत्मविश्वासाने त्याने या कार्यक्रमाच्या मंचाचा ताबा घेतला होता. त्याने रवीना, अर्शद आणि बोमन यांना त्याच्या आत्मविश्वासाने मंत्रमुग्ध केले. श्रेयससोबत त्याचे वडील देखील आले होते. त्याच्या वडिलांनी या कार्यक्रमात सांगितले, श्रेयस हा पाचव्या वर्षापर्यंत अगदी सामान्य मुलासारखा होता. त्याने वयाच्या पाचव्या वर्षी गाणे म्हणण्यास सुरुवात केली. पण एका दुर्दैवी दिवशी तो इतर मुलांपेक्षा वेगळा असल्याचे त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आले. अचानक त्याचे वजन आणि केस खूपच कमी झाले होते. यामुळे त्याला डॉक्टरांकडे नेले असता त्याला प्रोजेरिया हा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तो खूपच छान पेटी वाजवतो आणि त्याला गाणे गायला खूप आवडते. श्रेयसला या कार्यक्रमातील विराद त्यागी खूप आवडतो. संपूर्ण कार्यक्रमात तो त्याच्यासोबतच बसला होता. श्रेयसने चन्ना मेरिया हे गाणे या कार्यक्रमात सादर केले.