विकासने कोणासाठी बनवले खास बर्गर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 14:26 IST
विकास खन्नाचा नुकताच वाढदिवस झाला. हा वाढदिवस त्याने खूप चांगल्या पद्धतीने साजरा करायचा असे ठरवले होते. तो गेल्या काही ...
विकासने कोणासाठी बनवले खास बर्गर?
विकास खन्नाचा नुकताच वाढदिवस झाला. हा वाढदिवस त्याने खूप चांगल्या पद्धतीने साजरा करायचा असे ठरवले होते. तो गेल्या काही महिन्यांपासून मास्टर शेफचे चित्रीकरण करत आहे. त्यामुळे तो प्रचंड व्यग्र आहे. त्यामुळे त्याने वाढदिवसाच्या दिवशी चित्रीकरण न करता सुट्टी घेण्याचे ठरवले आणि हा संपूर्ण दिवस त्याने खूपच चांगल्याप्रकारे साजरा केला. विकासचा यंदाचा वाढदिवस हा 45वा होता. विकासचे वय वाढले असले तरी तो मनाने एखाद्या लहान मुलाप्रमाणेच आहे. त्यामुळे त्याने वाढदिवसाचा संपूर्ण दिवस स्माइल फाऊंडेशनच्या मुलांसोबत घालवला. विकासने बनवलेले जेवण एकदा तरी चाखायला मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. पण सगळ्यांसाठी ते शक्य होत नाही. त्यामुळे विकासने या मुलांना खास ट्रीट द्यायची ठरवली. त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या मुलांसाठी त्याने आणि त्याच्या टीमने मिळून खास बर्गर बनवले होते. विकास तिथे पोहोचल्यावर या मुलांनी विकासचे खूपच उत्साहात स्वागत केले. त्यांना विकासने बनवलेले बर्गर तर खूपच आवडले. त्यांनी विकाससाठी केकदेखील आणला होता. विकासने सगळ्या मुलांसोबत केक कापला. सेलिब्रेशन झाल्यानंतर या मुलांनी विकासला खूपच छान सरप्राईज दिले. या सगळ्या मुलांनी स्वतः बनवलेली शुभेच्छापत्र त्याला दिली. ही शुभेच्छापत्र पाहून विकास खूपच भावूक झाला होता. तो सांगतो, "या मुलांसोबत माझा वाढदिवस खूपच चांगल्याप्रकारे साजरा झाला. या मुलांनी माझ्या वाढदिवसासाठी घेतलेली मेहनत पाहून माझ्याकडे बोलायला शब्द नव्हते. मला माझ्या वाढदिवसाला जगभरातून माझे फॅन्स शुभेच्छा पाठवत आहेत. माझ्या या सगळ्या फॅन्सना भेटण्याची माझी इच्छा आहे."