Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम एरिका फर्नांडिसने घेतली शाहीर शेखची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 10:18 IST

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. या मालिकेतील देव आणि सोनाक्षी यांची जोडी ...

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. या मालिकेतील देव आणि सोनाक्षी यांची जोडी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावते. या मालिकेत एरिका फर्नांडिस सोनाक्षीच्या तर शाहीर शेख आपल्याला देवच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. एरिका आणि शाहीरची केमिस्ट्री सगळ्यांना आवडत असली तरी ते दोघे खऱ्या आयुष्यात एकमेकांशी बोलत नाहीत अशा बातम्या काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. पण या दोघांनीही या केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. पण आता एक प्रसंगातून एरिका आणि शाहीर हे दोघे केवळ सहकलाकाराच नाहीत तर चांगले फ्रेंड्स असल्याचेदेखील सिद्ध झाले आहे. कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत आपल्याला शाहीर सध्या खूपच कमी पाहायला मिळत आहे आणि त्याबाबत या मालिकेच्या फॅन्सची तक्रार आहे आणि त्यांनी यामुळे सोशल नेटवर्किंग साइटवर त्याच्या विरोधात अनेक कमेंट लिहिल्या आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये म्हटले आहे की, शाहीर त्याच्या कामाच्या बाबतीत अतिशय बेजबाबदार असून तो इंडोनेशियाला सतत हॉलिडेसाठी जात असतो. पण या सगळ्यावर एरिकाने खूपच चांगले उत्तर दिले आहे. तिने सोशल नेटवर्किंग साइटवर एक पोस्ट लिहून त्यात म्हटले आहे की, आम्हीदेखील माणूस असून आम्हालादेखील ब्रेकची नितांत गरज असते. देव मालिकेत दाखवला जात नाही याबद्दल अनेक संदेश आम्हाला मिळत आहेत. शाहीर सतत सुट्ट्या घेतो असे लोकांचे म्हणणे आहे. पण मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, तो काही सुट्टीवर जात नाही. खरे तर त्याला कित्येक दिवसांपासून सुट्टी घेण्याची गरज आहे. कारण तो भारताप्रमाणे इंडोनेशियामधीलदेखील एका मालिकेत काम करत आहे आणि या सगळ्यात थकून त्याने एखाद्या दिवशी सुट्टी घेतली तर काय चुकते असे मला वाटते. मालिकेत तुम्ही जे काही पाहाता ते चित्रीत करण्यासाठी आम्ही दिवसभर मेहनत घेत असतो. कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच शाहीरने त्याच्या इंडोनेशियातील मालिकेविषयी कल्पना दिली होती. त्यामुळे तो इंडोनेशियाला चित्रीकरणासाठी अनेक वेळा जाणार असल्याची आम्हाला सगळ्यानाच कल्पना होती. मालिकेच्या कथानकाला पुढे अनेक वळणे मिळणार असून ती तुम्हाला नक्कीच आवडतील असेच मी सगळ्यांना सांगेन.