Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सुख कळले' मालिकेत सोहमची एन्ट्री, आदेश बांदेकरांच्या लेकावर महत्त्वाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 12:00 IST

स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत असलेल्या 'सुख कळले' मालिकेबाबत मोठी अपडेट, सोहम बांदेकरवर महत्त्वाची जबाबदारी

गेल्या काही दिवसांत टीव्हीवर अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अशातच आता कलर्स मराठी वाहिनीवरही लवकरच नवी मालिका सुरू होत आहे. 'सुख कळले' असं मालिकेचं नाव असून त्याचा प्रोमोही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेत स्पृहा जोशी आणि अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेतून एका नव्या मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेत आता आदेश बांदेकरांचा लेक सोहम बांदेकरची एन्ट्री झाली आहे. 

स्पृहा जोशीच्या 'सुख कळले' मालिकेत सोहमची एन्ट्री झाल्याने चाहत्यांच्या उत्सुकता वाढल्या आहेत. पण, या मालिकेत सोहम काम करताना दिसणार नाही. तर सोहम या मालिकेच्या निर्मितीची बाजू सांभाळणार आहे. सोहम प्रोडक्शन ही बांदेकरांची निर्मिती संस्था आहे. याद्वारे अनेक मालिकांची निर्मिती केली जाते. आता सुख कळले मालिकेची निर्मितीही सोहम प्रोडक्शनद्वारे केली जाणार आहे. याचं काम आदेश बांदेकरांचा लेक सोहम पाहत असल्याने त्याच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोहमने आभार मानले आहेत. २२ एप्रिलपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेची निर्मितीही सोहम प्रोडक्शनद्वारे होत आहे. सोहम अभिनयातही सक्रिय आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लक्ष्य' या मालिकेतून त्याने अभिनयात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तो डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता. केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा' या सिनेमातही तो झळकला होता. 

टॅग्स :आदेश बांदेकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता