मराठी कलाविश्वात एका लग्नाची जोरदार चर्चा आहे. सर्वांचे लाडके भावोजी म्हणजे आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर (Soham Bandekar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची याआधीही अनेकदा चर्चा झाली होती. तेव्हा त्याने प्रत्येक वेळी उत्तर देणं टाळलं होतं. मात्र आता त्याच्या लग्नाची बातमी पक्की झाली आहे. एका टीव्ही अभिनेत्रीच्याच तो प्रेमात असून तिच्याशी लग्न करणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
सोहम बांदेकर आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा. त्याच्याच नावे बांदेकर कुटुंबाचं प्रोडक्शन हाऊसही आहे. सोहम स्वत: निर्मिती संस्थेचं काम बघतो. त्यांच्या प्रोडक्शनखाली सुरु असलेली 'ठरलं तर मग' ही स्टार प्रवाहवरीच गाजणारी मालिका आहे. तर दुसरीकडे खऱ्या आयुष्यात सोहम कोणाच्या प्रेमात आहे माहितीये का? तर ही अभिनेत्री आहे पूजा बिरारी (Pooja Birari). 'राजश्री मराठी'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, सोहम आणि पूजा लवकरच लग्न करणार आहेत. ही बातमी मराठी मनोरंजनविश्वात वाऱ्यासारखी पसरली आहे. पूजा सध्या स्टार प्रवाहवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मंजिरी या मुख्य भूमिकेत दिसत आहे. पूजाच्या अभिनयाचं आणि सौंदर्याचं नेहमीच कौतुक झालं आहे. बांदेकरांची सून होणार म्हटल्यावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पूजा बिरारी मूळची पुण्याची असून ती २९ वर्षांची आहे. सोहम आणि पूजा कधी प्रेमात पडले? त्यांची भेट कशी झाली? याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याआधी आता दोघांच्या लग्नाचा मुहुर्त नक्की कधी आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहे पूजा बिरारी?
पूजा बिरारीने 'साजणा' मालिकेत काम केलं होतं. यानंतर ती २०२१ साली आलेल्या 'स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा' या मालिकेत दिसली. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. सध्या ती 'येड लागलं प्रेमाचं'मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तसंच पूजा सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.