झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' (Lakshmi Niwas Serial) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत लक्ष्मीची भूमिका अभिनेत्री हर्षदा खानविलकरने साकारली आहे. तर श्रीनिवासची भूमिका अभिनेते तुषार दळवी (Tushar Dalvi) यांनी नुकतेच एका मुलाखतीत दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर (Smita Talwalkar) यांच्यासोबतच्या मतभेदाचा किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, "स्मिता तळवलकर नाराज झाल्या, काहीसे गैरसमज झाले आणि मी त्या मालिकेतून बाजूला झालो होतो."
अभिनेते तुषार दळवी यांनी 'जिवलगा' सिनेमातून मराठीचा नायक म्हणून लोकप्रियता मिळवली होती. पण हा चित्रपट करत असताना त्यांच्याकडे स्मिता तळवलकर यांच्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. चित्रपट की मालिका अशा द्विधा मनस्थितीत असतानाच स्मिता तळवलकर आणि दिग्दर्शक संजय सुरकर नाराज झाले मतभेद वाढले.
"दोन्ही भूमिका मला करायच्या आहेत, पण..."
याबद्दल तुषार दळवी यांनी सांगितले की, "'जिवलगा' चित्रपटावेळी स्मिता तळवलकर 'राऊ' ही मालिका करणार होत्या. त्यात मला मुख्य भूमिका मिळाली होती. पण दोन्ही मुख्य भूमिका करताना तारखा मॅच होत नव्हत्या. त्यामुळे चित्रपट करावा की मालिका? असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी ३ एपिसोड्स शूट करून दाखवल्यानंतर चॅनेल मालिकेत काय बदल हवेत ते सांगून परवानगी देत होते. ३ एपिसोड्सचे शूटिंग झाल्यानंतर मी डेट जुळत नसल्याचे स्मिता तळवलकर यांना सांगितले. दोन्ही भूमिका मला करायच्या आहेत, पण यावर तुम्हीच मला मार्गदर्शन करा असे मी म्हटले तेव्हा मतभेद झाले, नाराजी दिसून आली आणि प्रत्यक्षात जेव्हा ते तीन एपिसोड टेलिव्हिजनवर बघितले तेव्हा मी त्यात नव्हतो. ती मालिका एक दुसऱ्या कलाकाराला देण्यात आली. तेव्हा या मालिकेला खूप लोकप्रियताही मिळाली."
"आमच्यात झालेले गैरसमज आणि मतभेद दूर झाले"
ते पुढे म्हणाले की, "त्यानंतर मी हिंदी मालिका करू लागलो. त्याचदरम्यान अल्फा वाहिनी सुरू झाली आणि तेव्हा स्मिता तळवलकर यांच्याच मालिकेत मला पुन्हा एकदा बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यावेळी आमच्यात झालेले गैरसमज आणि मतभेद दूर झाले."