'बिग बॉस मराठी' फेम गायक उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) काश्मीरला फिरायला गेला आहे. तिथे काही युवा लोकांसोबत त्याने गाणी म्हणण्याचा (जॅमिंगचाही )आनंद घेतला. उत्कर्षने काश्मीरमधील अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये एका दुकानात त्याला वेगळाच अनुभव आला. काश्मिरी दुकानदार उत्कर्षसोबत चक्क मराठी बोलण्याचा प्रयत्न करत होता. उत्कर्षला ही गोष्ट खूप आवडली आणि तो लगेच सोशल मीडियावर यावर लिहून व्यक्त झाला.
उत्कर्ष शिंदे काश्मीरमध्ये ड्राय फ्रूट्सच्या दुकानात गेलेला दिसत आहे. यामध्ये तो दुकानदार त्याला म्हणतो, 'हे खाऊन बघा, पटकन पटकन, एकदम चांगला चांगला...'. यासोबत उत्कर्षने लिहिले, "महाराष्ट्रात मराठी बोलायला काहींना शिकायचंच नाही म्हणे. कोणतीही भाषा माणसे जोडण्यासाठी उदयास येते. पण काहींना त्यांचा धंदा महाराष्ट्रात करायचाय,पैसे इथून कमवायचे , रोज ट्रेन भरून लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात घेऊन यायचे पण भाषा मराठी शिकायची नाही का?."
"आज काश्मीर श्रीनगर मधे वाणी ड्रायफ्रूट्सच्या दुकानात गेलो असता मुंबई? महाराष्ट्र मधून आले का तुम्ही? बसा बसा म्हणत त्या काश्मिरी दुकानदाराने मराठीत संवाद सुरू केला. तोडकं मोडकं बोलत आमचे मराठी मन जिंकले. त्याला जर कळत असेल भाषा शिकल्याने मराठी माणस अजून दोन गोष्टी जास्त घेतील आपला धंदा चालेल. त्या काश्मिरी मुस्लिम बांधवाला कळाले हे भाषेच महत्व. त्याच्या मराठी बोलल्यामुळे २ च्या जागी १० गोष्टी घेतल्या आणि जय महाराष्ट्र म्हणत “खुदाहाफिज फिर आयेंगे भाई “ म्हणत त्याच्या ही भाषेला मान देत तिथून निघालो. मराठी भाषा आपली नाही समजून काही माणसं दूर जातायेत त्यांना मला हेच सांगायच आहे... तुम्ही आमच्या मराठीला मान सन्मान द्या आम्ही तुमच्या भाषेला मनात स्थान दिलेच आहे. हिंदी-मराठी भाई भाई फिर मग कशाला करायची उगाच लढाई?"