Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुपेरी पडद्यावर हे कलाकार ठरले फ्लॉप,मग छोट्या पडद्याचा घेतला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 14:25 IST

चित्रसृष्टीत नाव कमावण्याचं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवतात. मात्र रुपेरी पडद्यावर रसिकांची मनं ...

चित्रसृष्टीत नाव कमावण्याचं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण बॉलीवुडमध्ये पाऊल ठेवतात. मात्र रुपेरी पडद्यावर रसिकांची मनं जिंकण्यात सगळ्याच सिने कलाकारांना जमत नाही. या कलाकारांमध्ये मोजकेच कलाकार प्रसिद्धीच्या यशशिखरावर पोहचतात. मात्र काहींना या यशाची चव चाखायलाच मिळत नाही. त्यामुळे सिनेमा जोरदार आपटल्यानंतर हे कलाकार आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवतात. पाहूया कोण आहेत असे कलाकार ज्यांनी सिनेमात फ्लॉप ठरल्यानंतर छोट्या पडद्यावर आपलं नशीब आजमावलंविवेक मुश्रन 1991 साली अभिनेता विवेक मुश्रान यानं सौदागर या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. या सिनेमात रसिकांचं आकर्षण ठरलं ते मनीषा कोईराला आणि दिलीप कुमार-राजकुमार यांची जुगलबंदी. मात्र विवेकची रसिकांकडून फारशी दखल घेतली गेली नाही. सौदागर सिनेमानंतर त्याच्या वाट्याला ऐसी भी क्या जल्दी है, फर्स्ट लव लेटर, जान, राम जाने अशा सिनेमातील भूमिका आल्या. बेगम जान हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला. मात्र यातून रसिकांची मनं जिंकण्यात विवेक अपयशी ठरला. रसिकांनी त्याला साफ नाकारलं. त्यामुळेच त्याने आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला. विवेकने अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं. सोनपरी, किटी पार्टी, भास्कर भारती, ऐ दिल ए नादाँन, बात हमारी पक्की है, परवरिश-कुछ खट्टी कुछ मिठ्ठी, निशा अशा मालिकांमध्ये विवेकने भूमिका साकारल्या. शेखर सुमन अभिनेता आणि होस्ट अशी शेखर सुमन यांची ओळख. रुपेरी पडद्यावर उत्सव, अनुभव, रणभूमी, इंसाफ अपने लहू का, यासारख्या फ्लॉप सिनेमात शेखर सुमन यांनी भूमिका साकारल्या. सिनेमात फ्लॉप ठरल्यानंतर शेखर सुमन यानं आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला. देख भाई देख, हेराफेरी, मूव्हर्स एंड शेखर्समधून छोट्या पडद्यावरील रसिकांची मनं जिंकली. अविनाश वाधवाँ प्यार हो गया, मीरा का मोहन, गीत, जुनुन अशा सिनेमांमध्ये अभिनेता अविनाश वाधवाँने भूमिका साकारल्या आहेत. मात्र या सिनेमातून रसिकांवर प्रभाव टाकण्यात आणि त्यांची मनं जिंकण्यात अविनाश अपयशी ठरला. त्यामुळे त्याने आपला मोर्चा टीव्हीकडे वळवला. त्याने बालिका वधू, जुनूनः ऐसी नफरत तो कैसा इश्क, सपना बाबुल का बिदाई, सीआयडी या मालिकांमध्ये काम केलं आहे.रोनित रॉय अभिनेता रोनित रॉयनं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बॉलीवुडपासून केली. जान तेरे नाम, 15 ऑगस्ट, हलचल अशा सिनेमात त्यानं भूमिका साकारल्या. मात्र छोट्या पडद्यावरील क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेतील मिहीर आणि कसोटी जिंदगी की या मालिकेतील ऋषभ बजाज या भूमिकेनं त्याला नवी लोकप्रियता मिळाली. सध्या अदालत या मालिकेतून तो रसिकांची मनं जिंकत आहे. शिवाय सिनेमातही विविध प्रकारच्या भूमिका तो साकारत आहे. अपूर्व अग्निहोत्री 'परदेस' या सिनेमातून अभिनेता अपूर्व अग्निहोत्रीनं चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. क्रोध, प्यार दिवाना होता है, लकीर, अशा सिनेमातही त्यानं भूमिका साकारल्या मात्र रसिकांनी त्या साफ नाकारल्या. मात्र अपूर्वला खरी ओळख मिळवून दिली ती छोट्या पडद्याने. जस्सी जैसी कोई नहीं या मालिकेत त्यानं साकारलेली अमरान सूरी भूमिका रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली. त्यानंतर राधा की बेटियाँ कुछ कर दिखायेंगी, सपना बाबुल का बिदाई आणि अजीब दास्ता हैं ये या मालिकांमध्ये त्याने काम केले. तनिषा मुखर्जी प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची लेक आणि अभिनेत्री काजोल हिची धाकटी बहिण म्हणजे तनिषा. मात्र आई आणि बहिणीप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावण्याचं तिचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही. पॉपकॉर्न खाओ मस्त हो जाओ, नील एंड निक्की, वन टू थ्री अशा सिनेमात काम केलं. मात्र हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. मात्र 2013 साली बिग बॉसच्या सातव्या सीझनमधून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली. बिग बॉसच्या घरात अरमान कोहलीसोबत असलेल्या लिंकअप आणि अफेअरच्या चर्चांनी तनिषाला प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर गँग्स ऑफ हँसीपूर, खतरों के खिलाडी अशा शोमध्येही तनिषानं काम केलं. अरमान कोहली दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा मुलगा असलेल्या अरमान कोहली याने बदले की आग, राजतिलक, औलाद के दुश्मन, जानी दुश्मन अशा सिनेमात काम केलं. मात्र सिनेरसिकांनी अरमानला साफ नाकारलं. यानंतर बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये तो स्पर्धक म्हणून दाखल झाला. तनिषासह लिंक अप आणि विविध वाद यामुळे तो हिट ठरला. त्यामुळेच सलमानने त्याला प्रेम रतन धन पायो या सिनेमात काम करण्याची संधी दिली. तुम्हारी पाखी या मालिकेतही त्यानं भूमिका साकारलीय.