झी मराठीवरील गाजलेल्या 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. यश आणि नेहा यांची प्रेमकहाणी जितकी लोकप्रिय झाली, तितकीच प्रेक्षकांनी यश आणि समीर यांची मैत्रीही आवडली होती. यश आणि समीर ही जोडी म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे ( Shreyas Talpade) आणि संकर्षण कऱ्हाडे(Sankarshan Karhade). श्रेयस आणि संकर्षण यांची खर्या आयुष्यातील मैत्रीही तितकीच घट्ट आहे.
सध्या संकर्षण कऱ्हाडे याचं 'कुटुंब किर्रतन' हे नाटक रंगभूमीवर यशस्वीपणे चालू आहे. नुकतंच श्रेयस तळपदे हा मित्र संकर्षणच्या नाटकाचा प्रयोग पाहायला पोहचला होता. त्यावेळीचा एक फोटो संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केला. त्यासोबत कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "प्रयोग बघायला अपना भाई आला होता". या फोटोत श्रेयस तळपदेसोबत त्याची पत्नी, तसेच अभिनेता सुमीत राघवन आणि त्याची पत्नी चिन्मयी राघवन हेही दिसून आले.
संकर्षण याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर श्रेयसनं कमेंट केली. त्यानं लिहलं, "प्रेम आहे तुझ्यावर डार्लिंग संकर्षण आणि तुझा खूप खूप अभिमान वाटतोय. नाटक अफलातून होतं. लेखन अप्रतिम. तुमचं सगळ्यांचं अभिनय तर लाजवाबच! एक परिपक्व मनोरंजनकार म्हणून तू जसा घडतोयस, ते पाहून खूप आनंद होतोय. तू एक खरा स्टार आहेस. असंच छान काम करत राहा, मित्रा!", असं म्हणत कौतुक केलं. तर त्यावर संकर्षण म्हणाला, "खूप मोठ्ठं मन लागतं हे म्हणायला. तूला भेटलो कि मी कम्माल घम्माल होतो. खूप आभार. आणि Love you कित्ती हे तुला माहितीये", असं म्हटलं.
'माझी तुझी रेशीमगाठ'ही मालिका जरी संपली असली तरी मालिकेतून निर्माण झालेलं मैत्रीचं नातं मात्र आजही ताजं आहे. संकर्षण आणि श्रेयस यांची मैत्री सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, चाहत्यांनी या दोघांच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. श्रेयस तळपदे आणि संकर्षण कऱ्हाडे हे पुन्हा एकदा एखाद्या प्रोजेक्टमध्ये एकत्र पाहायला मिळावेत, अशी चाहत्यांची इच्छा आहे.