Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयस-अमितच्या 'सिटीत गाव गाजतंय...' गाण्यातील सिग्नेचर स्टेप्सची रसिकांवर मोहिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 20:53 IST

अभिनेता श्रेयस तळपदेच्या 'चल भावा सिटीत' या नवीन कार्यक्रमाचे 'सिटीत गाव गाजतंय...' हे शीर्षकगीत सध्या खूप गाजत आहे. या गाण्याची कोरिओग्राफीही अमित बाईंगने केली आहे.

नृत्य दिग्दर्शन म्हणजेच कोरिओग्राफी हे कोणत्याही कलाकृतीचे महत्त्वाचे अंग मानले जाते. एखादे सुरेल गाणे नेत्रसुखद बनवण्यात कोरिओग्राफी महत्त्वाची भूमिका बजावते. मराठीतील आघाडीच्या कोरिओग्राफर्सपैकी एक असलेल्या अमित बाईंग या कोरिओग्राफरने आजवर मराठी-हिंदीतील बऱ्याच कलाकारांना आपल्या तालावर नाचवले आहे. अभिनेता श्रेयस तळपदेच्या 'चल भावा सिटीत' या नवीन कार्यक्रमाचे 'सिटीत गाव गाजतंय...' हे शीर्षकगीत सध्या खूप गाजत आहे. या गाण्याची कोरिओग्राफीही अमित बाईंगने केली आहे. 

२०१९मध्ये 'अगं बाई सासूबाई' मालिकेच्या गाण्याची कोरिओग्राफी करताच कोरिओग्राफर अमित बाईंग हे नाव झी मराठी वाहिनीसोबत जोडले गेले. त्यानंतर या वाहिनीसाठी त्याने २५-३० गाणी केली. याखेरीज कलर्स मराठीसाठी 'बिग बाॅस मराठी १-२' आणि सोनी मराठी वाहिनीसाठीही अमितने गाणी केली आहेत. 'सिटीत गाव गाजतंय' हे अमितने श्रेयससाठी कोरिओग्राफ केलेले दुसरे गाणे आहे. सर्वप्रथम 'माझी तुझी रेशीमगाठ' या गाण्यासाठी अमितने श्रेयससोबत काम केले होते. आता 'सिटीत गाव गाजतंय' हे अमित आणि श्रेयस या जोडीचे दुसरे गाणे धुमाकूळ घालत आहे.

अमितच्या कामावर बेहद्द खुश असलेला श्रेयस म्हणाला की, 'सिटीत गाव गाजतंय' या गाण्याच्या निमित्ताने मी अमितसोबत दुसऱ्यांदा काम केले आहे. यापूर्वी 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचे टायटल ट्रॅक अमितने कोरिओग्राफ केले होते. गाण्याचा जॅानर आणि फिल समजून त्याप्रमाणे कोरिओग्राफी करणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. 'सिटीत गाव गाजतंय' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' या दोन गाण्यांमध्ये जमीन-आसमानाइतके अंतर आहे. हे मासेसला आवडेल असे उडत्या चालीवरील गाणे आहे. अमितने याची सिग्नेचर स्टेप छान, सहज, सुंदर आणि लहानांपासून थोरांपर्यंत कोणीही कॅच करू शकेल अशी बसवली आहे. अमित खूप गुणी, प्रोडक्शन आणि दिग्दर्शनाचा विचार करून काम करणारा कोरिओग्राफर आहे. तो कायम कारिओग्राफीत नावीन्यपूर्ण गोष्टी आणण्याच्या प्रयत्नात असतो, असेही श्रेयस म्हणाला.श्रेयससोबत दुसऱ्यांदा काम करून आनंदी असलेला अमित म्हणाला की, श्रेयस खूप मेहनती आणि भारी अभिनेता आहे. खूप सपोर्टिव्ह आहे. माझ्या व्हीजनप्रमाणे त्याने परफॅार्म केले आणि आज ते सर्वांना आवडत आहे. 'सिटीत गाव गाजतंय' या गाण्याची हुक स्टेप खूप व्हायरल झाली आहे. यावर रिल्स बनत आहेत. गाण्याचा बाजानुसार नैसर्गिक डान्सिंग आणि क्रिएटीव्ह स्टेप्स तयार केल्या. श्रेयसलाही त्या खूप आवडल्या. विशेष करून लहान मुलांना हा डान्स खूप आवडत आहे. लवकरच मी एका बिग बजेट चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडेही वळणार आहे. हा चित्रपट मराठीसोबत हिंदीतही बनेल, असेही अमितने सांगितले.

वर्कफ्रंट'कॅनव्हास' या मराठी चित्रपटाद्वारे अमित सिनेसृष्टीकडे वळला. त्यानंतर तिग्मांशु धुलिया यांच्या 'साहिब बीवी और गँगस्टर' चित्रपटासाठी कोरिओग्राफी करत अमितने हिंदीत झेप घेतली. दरम्यानच्या काळात सयाजी शिंदे-मकरंद अनासपुरेंचा 'पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा', लक्ष्मण उतेकरांचा 'लालबागची राणी', अजय फणसेकरांचा 'चीटर', आदित्य सरपोतदारांचा 'उनाड' आदी बऱ्याच चित्रपटांची कोरिओग्राफी अमितने केली. मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच अमितने गुजराती चित्रपट, पंजाबी गाणी आणि म्युझिक व्हिडिओजचीही कोरिओग्राफी केली आहे. यात जावेद अलीच्या म्युझिक व्हिडिओचाही समावेश आहे. एबी एन्टरटेन्मेंट प्रोडक्शन या स्वत:च्या निर्मिती संस्थेत अमितने चार गाणी, तसेच 'मुंबई १६' आणि 'बागुलबुवा' या दोन लघुपटांची निर्मितीही केली आहे.

टॅग्स :श्रेयस तळपदे