Shreya Bugde Post For Kushal Badrike: झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमधून अनेक विनोदवीर घराघरात पोहचले. यातून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि अभिनेत्री श्रेया बुगडे(Shreya Bugde) देखील प्रसिद्धीझोतात आले. या कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, जी आजतागायत कामय आहे. सध्या हे दोघेही 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वामुळे चर्चेत आहे. यातच श्रेया बुगडेनेकुशल बद्रिकेसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअरे केली आहे.
कुशल बद्रिके याचा काल वाढदिवस होता. आपल्या खास मित्राच्या वाढदिवसानिमित्त श्रेयाने कुशलबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, "कुशल बद्रिके तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! भन्नाट आठवणींसाठी, अगणित ट्रॅव्हल स्टोरीसाठी, कधीही न संपणारी मस्ती, मला हसवण्यासाठी तुझे धन्यवाद. तसेच मला मार्गदर्शक व मित्र म्हणून साथ दिल्याबद्दल आणि अपार प्रेम आणि दयाळूपणासाठी तुझे आभार. तुझ्यासारखं जगात दुसरं कोणीही नाही. असाच राहा. समुद्रासारखा निखळ निरंतर वाहणारा, आभाळासारखा निस्सीम. सगळं सगळं व्यापून टाकणारा", या शब्दात श्रेयाने कुशल बद्रिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
श्रेयाच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. श्रेयाच्या या पोस्टवर कुशल बद्रिकेने कमेंटही केली आहे. "खूप खूप प्रेम तुला , आता नवीन फोटोज काढायची वेळ येऊन ठेपली आहे. आणि जगात तू सुद्धा तुझ्यासारखं दुसरं कोणी नाही. खूप प्रेम यार"" अशी कमेंट कुशलने केली आहे.
कुशल आणि श्रेया एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे मजेशीर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता ही जोडी लवकरच 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात पाहायला मिळणार आहे. 'चला हवा येऊ द्या:कॉमेडीचं गँगवॉर' २६ जुलैपासून झी मराठीवर सुरु होत आहे. शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता कार्यक्रम प्रसारित होणार आहे.