सध्या मराठी मनोरंजन विश्वात 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाची खूप उत्सुकता आहे. या नवीन पर्वात निलेश साबळेच्या जागी अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आज अभिजीत खांडकेकरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्रेयाने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. जी चर्चेत आहे. श्रेया लिहिते, "वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अभी! माझ्याकडे व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात असे प्रसंग फार दुर्मिळ असतात. कारण अनेकदा मी भारावून जाते."
"मला तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की, तू माझ्या आयुष्यातील देवदूत आहेस. गेलं वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेलं. माझी तब्येतही फार बिघडली होती. त्यावेळी या सर्व गोष्टींचा मी सहजपणे सामना करेल, याची काळजी तू घेतलीस. तुझा दयाळूपणा आणि प्रेमळपणा वाखाणण्याजोगा आहे. तुझं हृदय प्रेमाने भरलेलं आहे. संपूर्ण जगाला आणि तुझ्या चाहत्यांना तुझ्या व्यक्तिमत्वातील नम्र स्वभाव माहिती आहे. पण यापलीकडे तुझं मन किती चांगलं आहे, हे मला माहितीये. तुझ्यासारखा मित्र प्रत्येकाला भेटावा. मला तुझ्यासारखा मित्र आहे त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते."
"मी तुला एक सुंदर आयुष्य, उत्तम आरोग्य आणि तुला भविष्यात अधिक चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी शुभेच्छा देते. आणि लवकरच सुरू होणाऱ्या चला हवा येऊ द्याच्या शूटिंगची मी आतुरतेने वाट पाहत आहे. आपण नक्कीच काही चांगल्या आठवण निर्माण करु. इतकी वर्ष मी तुला ओळखतेय तू कायम एक उत्तम माणूस राहिला आहेस. असाच पुढे जात राहा मित्रा! देव तुझं भलं करो! खूप प्रेम." अशाप्रकारे श्रेयाने पोस्ट लिहिली आहे. 'चला हवा येऊ द्या'चं नवीन पर्व झी मराठीवर २६ जुलैपासून शनिवार-रविवार रात्री ९ वाजता बघायला मिळणार आहे.