Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशु-शिवाची नवीन लढाई! नाईट स्कुल, घर आणि नाती सांभाळण्याची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:14 IST

Shiva Serial : 'शिवा' मालिकेत या आठवड्यात खूप काही घडामोडी घडणार आहेत.

'शिवा' मालिकेत (Shiva Serial) या आठवड्यात खूप काही घडामोडी घडणार आहेत. ‘हॉरायझन’ कंपनीच्या सीईओकडून येणाऱ्या दबावामुळे आशूवर प्रचंड मानसिक ताण आहे. तो कामात इतका गुंतून जातो की त्याला वैयक्तिक आयुष्याला वेळ देणं अशक्य होतं. शिवाच्या नाईट स्कूलमुळे त्यांचं एकमेकांशी भेटणंही कमी होत आहे आणि त्यामुळे आशू-शिवाच्या नात्यात हळूहळू अंतर येऊ लागलंय. दरम्यान, एका गंभीर सामाजिक मुद्द्यावर शिवा आवाज उठवणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या आणि एका शिक्षकाच्या मदतीने ती स्थानिक नगरसेवकाच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करायचे ठरवते. हे सगळं ती अत्यंत नाट्यमय आणि प्रभावी पद्धतीने प्लान करते, ज्यामुळे परिसरात मोठा संघर्ष उफाळून येतो. शिवाला तपासात मदत केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून शांताबाई पाटील यांना पाटील कुटुंबात आणलं जातं. त्यांचं औपचारिक स्वागत केलं जातं, मात्र काही दिवसांतच सिताईला त्यांच्या वागणुकीबाबत संशय निर्माण होतो. शांताबाईचं विचित्र वागणं, त्यांचे मानसिक अस्थैर्य घरात तणावाचं वातावरण निर्माण करते. 

देसाई कुटुंबात आनंदाचे वातावरण

दुसरीकडे, चंदनच्या आयुष्यात एका नव्या मुलीचा प्रवेश झालाय. त्यामुळे दिव्याची असुरक्षितता वाढते आणि ती चंदनला जाब विचारते. यामुळे त्यांच्या नात्यात अंतर आणि संशय वाढू लागतो. रॉकी आपल्या युपीएसी परीक्षेच्या अंतिम फेरीची तयारी करत आहे. त्याच वेळी त्याच्या आणि संपदाच्या साखरपुडा व लग्नाविषयी घरात चर्चा सुरु होते, ज्यामुळे देसाई कुटुंबात आनंदाचे आणि उत्साही वातावरण आहे. या साऱ्या घडामोडी तुम्हाला शिवा मालिकेच्या येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहेत.