'सुपर डान्सर चॅप्टर ५'च्या आगामी भागात प्रेक्षकांना मस्ती की पाठशाला या खास थीमसह शालेय आठवणींचा एक सुंदर प्रवास पाहायला मिळणार आहे. या विशेष भागात एक भावुक क्षण येतो, जेव्हा शोच्या टीमने जज शिल्पा शेट्टीच्या शाळेला भेट दिली. बॉलिवूडमध्ये शिल्पा शेट्टीला ३० वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने एक खास व्हिडीओ क्लिप सादर करण्यात आली. यावेळी अभिनेत्रीच्या शालेय आयुष्याचे सुंदर क्षण दाखवले गेले आहेत. या क्लिपमध्ये त्यांच्या बालपणीच्या आठवणी, वर्गमित्र, शिक्षक आणि अगदी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिकाही सामील झाल्या होत्या.
यावेळी शिल्पा शेट्टी भावुक झाली. तिला अश्रू अनावर झाले. तिने सांगितले, “खरं सांगायचं तर अजूनही विश्वास बसत नाही की मला इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षं पूर्ण झाली आहेत. मी कधीच कल्पना केली नव्हती की मी आयुष्यात इतकं काही मिळवू शकेन. जेव्हा लोक सांगतात की माझ्या प्रवासाने त्यांना प्रेरणा दिली, तेव्हा मी स्वतःला खूप आभारी आणि भाग्यवान समजते. मला आनंद होतो की लोक मला सर्वप्रथम एक चांगला माणूस म्हणून ओळखतात आणि त्यानंतर माझ्या सर्व यशाची दखल घेतात. शाळेचे दिवस खरंच आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते.”
मनोरंजनाने भरलेली परफॉर्मन्सेस, शालेय आठवणींनी ओथंबलेले क्षण आणि शिल्पा शेट्टीची हृदयस्पर्शी भावना यामुळे ‘मस्ती की पाठशाला’ हा भाग ‘सुपर डान्सर’च्या सर्वात संस्मरणीय भागांपैकी एक ठरला. हा एपिसोड शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी LIV वर पाहायला मिळेल.