मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं ३१ ऑगस्ट रोजी कर्करोगामुळे निधन झाले. ती ३८ वर्षांची होती. तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे सहकलाकार आणि चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. दरम्यान प्रियाचा चुलत भाऊ आणि अभिनेता सुबोध भावेने नुकतेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रियाच्या आठवणी, सहकलाकार म्हणून आलेला अनुभव सांगितला आहे. इतकेच नाही तर प्रियाची शेवटची मालिका तू भेटशी नव्यानेमध्ये ते दोघे एकत्र काम करत होते. तेव्हाच्या आठवणींनीही यावेळी सुबोधने सांगितल्या आहेत.
सुबोध भावेने लोकमत फिल्मीला सांगितलं की, प्रियाचं असं अकस्मात निघून जाणं सगळ्यांसाठी भयंकर धक्कायदायक होतं. आता शेवटी प्रियाने आणि मी तू भेटशी नव्याने या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यात ती निगेटिव्ह भूमिका करत होती. त्यावेळी तिला सेटवर बघून मला इतका आनंद झाला होता. कारण त्याआधी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यातून ती बाहेर पडली होती. त्यानंतर तिने नाटकाचे प्रयोग केले होते. इथे आणि अमेरिकेत दौरा केला होता. अचानक ती या मालिकेत ती माझ्यासमोर आली. तिला पाहून मला खूप बरं वाटलं. इतकी ताजीतवानी, फ्रेश दिसत होती. दिसायला अत्यंत सुंदर असूनही तिने खलनायिका तितक्याच उत्तमपणे वठवले. मी आजही सेटवर गेलो की माझे सीन पाठ नसतात. प्रिया सेटवर असायची तेव्हा तिचे सगळे सीन पाठ असायचे. एक मोठा भाऊ म्हणून सुद्धा आणि एक सहकलाकार म्हणून सुद्धा तिच्याबद्दल अपार कौतुक आणि प्रेम होतं. मराठी सिनेइंडस्ट्रीने प्रियाची दखल जितक्या प्रमाणात घ्यायला हवी होती तितक्या प्रमाणात घेतली नाही. पण अतिशय दिसायला गोड, उत्तम काम, प्रामाणिक काम करणारी प्रिया होती.
''पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला''
तो पुढे म्हणाला की, आजारपणातही ती ज्या एनर्जीने परत आली होती. माझ्या खऱ्या आयुष्यात मी तीन खऱ्या फायटर बायका पाहिल्या आहेत. त्यात स्मिता तळवलकर, रसिका जोशी आणि प्रिया मराठे. ज्या तडफीने आणि उर्जेने त्या परत आल्या. गेल्या वर्षी मालिकेच्या सेटवर गेल्यावर कळलं की प्रिया मालिका करत नाही. तेव्हा कळलं की तिचा कॅन्सर पुन्हा उफाळून आला. मध्ये मध्ये मी तिला फोन करत होतो. पण तिने कोणालाच भेटू दिलं नाही. मला असं वाटतं तिला या अवस्थेत तिच्या जवळच्या लोकांनी पाहावे अशी तिची इच्छा नसेल. पण शंतनूच्या टचमध्ये होतो. आजाराचं रडगाणंही ती कधी गायली नाही. या सगळ्या प्रवासात परत मी तिला कुठेतरी काम करताना बघेन असं मला वाटत होतं. मी त्या फोनची वाट बघत होतो. लढली ती.. पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला.