शर्मिला राजाराम सांगतेय हिंदी मालिकेत काम करतेय असे वाटतच नाहीये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 14:52 IST
शर्मिला राजाराम मेरे साई या मालिकेत चिऊताईची भूमिका साकारणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेच्या ...
शर्मिला राजाराम सांगतेय हिंदी मालिकेत काम करतेय असे वाटतच नाहीये
शर्मिला राजाराम मेरे साई या मालिकेत चिऊताईची भूमिका साकारणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेच्या चित्रीकरणाला शर्मिलाने सुरुवात देखील केली आहे. खूप सारे ऑडिशन दिल्यानंतर या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली आहे. शर्मिला तिच्या या भूमिकेविषयी सांगते, मी सहज एकदा दशमी प्रोडक्शनचे निनाद वैद्य यांच्यासोबत चॅट करत होते. त्यावेळी त्यांच्याकडून ते एक हिंदी मालिका करत असल्याचे मला कळले. त्यावर माझ्यासाठी काही भूमिका असेल तर नक्की सांगा असे मी त्यांना सांगितले. तर त्यांनी त्यांच्या क्रिएटिव्ह हेडशी मला बोलायला सांगितले. त्या क्रिएटिव्ह हेडने माझ्यासाठी एक रोल असल्याचे मला सांगितले आणि त्यानंतर माझी अनेक ऑडिशन्स घेण्यात आली. मी पॉझिटिव्ह रोलसाठी सुरुवातीला ऑडिशन दिले होते. त्यानंतर निगेटिव्ह व्यक्तिरेखेसाठी माझी ऑडिशन्स झाली. त्यानंतर खूप सारे लूक टेस्ट झाले. पण तरीही माझी या भूमिकेसाठी काही निवड झाली नव्हती. त्यामुळे ही मालिका आपल्याला मिळणार नाही असेच मला वाटत होते. पण काही दिवसांनी मला पुन्हा फोन आला आणि पुन्हा काही ऑडिशन्स आणि लूक टेस्ट झाल्यावर चिऊताई या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. या मालिकेचे चित्रीकरण सध्या आम्ही नायगाव येथे करत आहोत. या मालिकेचे चित्रीकरण करण्याचा आमचा अनुभव खूपच चांगला आहे. या मालिकेत मी आणि वैभव मांगले हे दोनच मराठी कलाकार आहेत. पण या मालिकेच्या युनिटमधील अनेकजण हे मराठी असल्याने आम्ही सगळे सेटवर मराठीतच बोलतो. आमचे मराठी ऐकून तुम्ही मराठीत काय बोलता हेच आम्हाला कळत नाही. त्यामुळे आता आम्ही देखील मराठी शिकणार आहोत असे आमचे अमराठी सहकलाकार आम्हाला सांगतात. प्रियांका ही हिंदीतली अभिनेत्री आहे, तिच्यासोबत मी माझा मेकअप रूम शेअर करते. मी माझ्या मेकअप दादा आणि हेअर ड्रेसरसोबत मराठीतच बोलते. त्यामुळे तिला काहीच कळत नाही. आता तिने देखील मराठी शिकायचे ठरवले आहे. सेटवरचे वातावरण हे मराठमोळे असल्याने मी एका हिंदी मालिकेत काम करत असल्याचे मला जाणवतच नाहीये. Also Read : तुम्हाला माहिती आहे का माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनायाची भूमिका या अभिनेत्रीला करण्यात आली होती ऑफर?