Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तेनाली रामा'मध्‍ये शारदा रामाकडून करणार अग्निपरीक्षेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 07:15 IST

रामाची विनोदबुद्धी आणि बुद्धिमत्ता दाखवणाऱ्या तेनाली रामा या सोनी सब वाहिनीवरील मालिकेच्या पुढील काही भागात आणखी एक खिळवून ठेवणारे कथानक पहायला मिळणार आहे

रामाची विनोदबुद्धी आणि बुद्धिमत्ता दाखवणाऱ्या तेनाली रामा या सोनी सब वाहिनीवरील मालिकेच्या पुढील काही भागात आणखी एक खिळवून ठेवणारे कथानक पहायला मिळणार आहे. रामाच्या (कृष्णा भारद्वाज) दुसऱ्या लग्नाचा गोंधळ संपतो ना संपतो, तोच त्याला शारदापुढे (निया शर्मा) आपले पावित्र्य सिद्ध करावे लागणार आहे. शिवाय काही गंभीर प्रकरणे सोडवायची आहेत ते वेगळेच.

सुगंधादेवी निघून गेल्यानंतरही रामाला शांती मिळालेली दिसत नाही, कारण पत्नी शारदा त्याच्याकडून अग्निपरीक्षेची मागणी करते. आधीच काही गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्याची जबाबदारी असलेल्या रामावर त्याचे पावित्र्य सिद्ध करण्याचा मोठा ताण आहे. शारदाने त्याला तिच्यासोबत एका खोलीत झोपण्यासही मनाई केलेली आहे. यातून तिचा त्याच्यावरील अविश्वास स्पष्ट दिसून येतो. शारदाने आपल्याला स्वीकारावे यासाठी पुरावा देण्याचा मार्ग शोधून काढण्याची जबाबदारी रामावर आहे. पत्नी शारदापुढे आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी रामा त्याची बुद्धिमत्ता कशी वापरेल?रामाची भूमिका करणारा कृष्णा भारद्वाज म्हणाला, “रामाच्या आयुष्यात एकावेळी बरेच काही सुरू आहे. त्याच्यावर समस्या सोडवण्याची जबाबदारी आहे आणि त्याचवेळी पत्नी शारदा हिच्‍यासोबतचे त्याचे नाते संकटात सापडले आहे. तो संकटात आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी सतत मनोरंजनाची हमी. कारण आगामी काही भागांमध्ये अनेक गोष्टी घडणार आहेत. तेनालीरामा मालिकेचा भाग असणे माझ्यासाठी खूपच छान अनुभव आहे. प्रेक्षक आमच्यावर खूप प्रेम करत आहेत आणि आम्हाला अधिक मेहनत घेण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.” 

शारदाची भूमिका साकारणारी निया शर्मा म्हणाली, “आपल्या नवऱ्याला विकल्याबद्दल रामाने शारदाला चांगलाच धडा शिकवला आणि त्यामुळे शारदाला खूप अपराधी वाटत आहे. मात्र, तिच्याकडे परत येण्यासाठी तिने रामाला एका विचित्र परिस्थितीत टाकले आहे. दुसऱ्या लग्नाच्या सगळ्या नाटकावर पडदा पडल्यानंतर रामाकडून तिने पावित्र्य सिद्ध करण्याची मागणी केली आहे. दरबारातील अनेक प्रकरणांमध्ये अडकलेला असताना रामा त्याचे पावित्र्य कसे सिद्ध करेल हे पाहणे प्रेक्षकांसाठी खूप मजेशीर असणार आहे.”

टॅग्स :तेनाली रामासोनी सब