Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरगमच्या पहिल्या भागात झळकणार शंकर महादेवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 14:05 IST

छोट्या पडद्यावर अनेक संगीत रिअॅलिटी शो आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही कार्यक्रमात स्पर्धक आपली गाणी सादर करून रसिकांचे मनोरंजन ...

छोट्या पडद्यावर अनेक संगीत रिअॅलिटी शो आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही कार्यक्रमात स्पर्धक आपली गाणी सादर करून रसिकांचे मनोरंजन करतात. यातून चांगला गायक कार्यक्रमाचा विजेता ठरतो तर काही कार्यक्रमात कोणतीही स्पर्धा नसून केवळ रसिकांचे मनोरंजन केले जाते. आता एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.'सरगम' हा अत्यंत वेगळ्या पठडीतला संगीतमय शो लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमात अनेक दिग्गज संगीतकार आणि गायक यांची एक संगीतमय बहारदार मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. लोक गीते, फोक संगीत, नाट्य संगीत जुनी गाजलेली गाणी, त्यांचे आजच्या काळातील तंत्रज्ञानाने बनवलेली नवीन रूपं, संगीत क्षेत्रातील नवीन टॅलेंटचा शोध, जुन्या गाण्यांना आजच्या संगीतमय मंडळींनी दिलेली मानवंदना असे बरेच काही या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तसेच संगीत क्षेत्रातील शिष्य त्यांच्या गुरूंना या कार्यक्रमाद्वारे एक आदरांजली देणार आहेत. या शो द्वारे मराठी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज एकाच प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक नवोदित कलाकारांना पहिल्यांदा मोठ्या प्लॅटफॉर्मवर स्वतःला सिद्ध करण्याची संधीसुद्धा या कार्यक्रमामार्फत दिली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात शंकर महादेवन झळकणार आहेत. शंकर यांनी अनेक चित्रपटांना संगीत देण्यासोबतच अनेक चित्रपटात गाणी गायली आहेत. त्यांनी कट्यार काळजात घुसली या चित्रपटात नुकतीच गायलेली गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या दिग्गज संगीतकारांद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याने पहिला भाग खूप स्पेशल असणार यात काही शंकाच नाही. मराठी संगीताशी नाळ असलेले उत्कृष्ट गायक आणि संगीतकार प्रत्येक भागात रसिकांच्या भेटीस येणार आहेत.