शाहरुख खानने कौतुक केले भगवान तिवारीचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 15:08 IST
गुलाम या मालिकेत काम करणारा भगवान तिवारी सध्या सातवे आसमान पे आहे. कारण त्याच्या अभिनयाचे कौतुक एका सुपरस्टारने केले ...
शाहरुख खानने कौतुक केले भगवान तिवारीचे
गुलाम या मालिकेत काम करणारा भगवान तिवारी सध्या सातवे आसमान पे आहे. कारण त्याच्या अभिनयाचे कौतुक एका सुपरस्टारने केले आहे. कोणत्याही कलाकाराला मिळालेली शाबासकीची थाप ही त्याच्यासाठी नेहमीच महत्त्वाची असते. रईस हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि नवाझुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत आहेत. या दोघांच्याही अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघेही कौतुक करत आहेत. या चित्रपटात अभिनेता भगवान तिवारीनेदेखील एक भूमिका साकरली आहे. भगवान तिवारी हा सध्या गुलाम या मालिकेत काम करत आहे.रईस या चित्रपटात तो एका पोलिसाच्या भूमिकेत झळकला आहे. त्याने या चित्रपटात एक गुजराती व्यक्तिरेखा साकारलेली आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक शाहरुख खानने केले असल्याने तो सध्या खूप खूश आहे. तो सांगतो, "शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यांनी माझे कौतुक केल्यामुळे मी खूपच खूश झालो होतो. ते इतके मोठे सुपरस्टार असले तरी ते आजही तितक्याच कळकळीने काम करतात. तसेच त्यांची शिस्त ही वाखाणण्याजोगी आहे. नवाझुद्दिन सिद्दीकीसोबत काम करताना मी खूप कर्म्फटेबल होतो. कारण त्याला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. आमची केमिस्ट्री खूप चांगली आहे. भविष्यातदेखील बाबू मोशाय बंदूकबाझ या चित्रपटातही आम्ही दोघे एकत्र काम करणार आहोत. गुलाम या मालिकेतील भूमिकेबद्दल तिवारी सांगतो, "या मालिकेत मी भीष्म प्रताप ही भूमिका साकारत आहे. तो अतिशय दुष्ट असून त्याच्या गावावर त्याचे राज्य आहे. त्यांच्या गावात स्त्रियांना अतिशय वाईट वागणूक दिली जाते. घरातील काम करणे इतकीच गोष्ट स्त्रीने करायची असे मानणारे हे लोक आहेत. स्त्रियांना या गावातील लोक एखाद्या गुलामाप्रमाणेच वागणूक देतात. मी रंगभूमीपासून माझा प्रवास सुरू केल्यामुळे कोणत्याही भूमिका साकारणे माझ्यासाठी कठीण जात नाही."