इंडियाज बेस्ट जुडवाच्या सेटवर करणवीर बोहराला मिळाले सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 15:09 IST
‘इंडियाज बेस्ट जुडवा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणवीर बोहरा करत असून त्याच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
इंडियाज बेस्ट जुडवाच्या सेटवर करणवीर बोहराला मिळाले सरप्राईज
‘इंडियाज बेस्ट जुडवा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणवीर बोहरा करत असून त्याच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने करणवीरला नुकतेच एक खूप छान सरप्राईज दिले. करणवीरचा नुकताच वाढदिवस झाला. पण या वाढदिवसाच्या दिवशी देखील संपूर्ण दिवसभर तो इंडियाज बेस्ट जुडवा या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत होता. करणवीरचे कुटुंबीय त्याला यंदाच्या वाढदिवसाला भेटू शकत नसल्याने तो काहीसा नाराज झाला होता. त्यामुळे या कार्यक्रमाच्या टीमने करणची जिवलग मैत्रीण अदा खान तसेच कार्यक्रमाचे निर्माते रघू व राजीव या जुळ्य़ा भावांना सेटवर बोलवले होते. कार्यक्रमातील स्पर्धक तसेच निर्मात्यांनी करणसाठी एक खास केक बनविला होता. या केकवर करणवीरच्या जुळ्य़ा मुली व्हिएन्ना आणि बेला यांचे प्रतीक म्हणून दोन जुळ्य़ा मुलींच्या प्रतिमा बनवण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या अखेरीस करणवीरची पत्नी टीजे आणि त्याच्या दोन मुलींचा एक व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला. तेव्हा करणवीरसह सर्वचजण भावुक झाले होते. याविषयी करणवीर सांगतो, “माझा वाढदिवस असला, तरी मी नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात व्यग्र होतो. आजचा दिवसही रोजच्या कामाच्या दिवसासारखाच जाईल, असे मला वाटत असतानाच निर्माते रघू आणि राजीव तसेच कार्यक्रमाच्या साऱ्या टीमने मला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. सेटवर माझी लाडकी मैत्रीण अदा खानला पाहून तर मला खूपच आनंद झाला होता. त्यानंतर टीजे आणि माझ्या मुलींचा संदेश पाहिल्यावर तर माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. माझा यंदाचा वाढदिवस माझ्यासाठी खरेच खास बनला. या कार्यक्रमाची संपूर्ण टीम ही मला माझ्या कुटुंबासारखीच आहे. त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करायला मिळाल्याने मी खूपच खूश झालो.”Also Read : करणवीर बोहराच्या जुळ्या मुली दिसणार या कार्यक्रमात