Join us

'तू सौभाग्यवती हो' मालिकेचं शूटिंग होतंय या राज्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 15:46 IST

नवी मालिका 'तू सौभाग्यवती हो'ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

देशावर कोरोनाचे संकट असताना सुरक्षिततेसाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे राज्यातील चित्रीकरणदेखील बंद करण्यात आले. एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सोनी मराठी वाहिनीवरील नवी मालिका 'तू सौभाग्यवती हो'ने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. साधी, गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावतले प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

राज्यातील चित्रीकरणावर बंदी आल्यामुळे मालिकांचे चित्रीकरण थांबले, पण 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना आत्तापर्यंत पाहायला मिळाले आणि सिनेसृष्टीत 'शो मस्ट गो ऑन' असे म्हटले जाते, त्याप्रमाणे हे मनोरंजन असेच अखंडित सुरू राहणार आहे. मनवा नाईकच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्शन या संस्थेची निर्मिती असलेली मालिका 'तू सौभाग्यवती हो'चा चमू आता गोव्याला पोहचला असून मालिकेच्या पुढील भागांचे चित्रीकरण गोव्यात होईल.

शशांक केतकरची धाकटी बहिण दीक्षा केतकर या मालिकेत काम करते आहे. तिची ही पहिलीच मालिका आहे. दीक्षाबरोबरच या मालिकेमध्ये हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरु दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकारही आहेत. 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. राज्याची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने होत आहे. अशात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. 

टॅग्स :शशांक केतकरकोरोना वायरस बातम्या