Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थांवर आधारीत मालिका 'जय जय स्वामी समर्थ' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 16:08 IST

स्वामी समर्थांचे जीवन चरित्र प्रेक्षकांना मालिकेद्वारे पहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर असे अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी वाट चुकलेलयांना मार्ग दाखवला, त्यांचे मार्गदर्शक बनले. त्यांच्या दारी आलेल्या भक्तांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अशाच ब्रह्मांडनायक 'श्री स्वामी समर्थ' ह्यांनी भक्तांना सन्मार्ग दाखवला.अशाच असाधारण सिध्दपुरुषाचे जीवनचरित्र 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे. शिरीष लाटकार लिखित या मालिकेची निर्मिती कॅम्सक्लब यांनी केली आहे.

मालिकेबद्दल बोलताना लेखक शिरीष लाटकर म्हणाले, "मुळात श्री स्वामी समर्थ हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली वीस वर्षं मी स्वामी मार्गात आहे. त्यामुळे मी ज्यांची भक्ती करतो त्या स्वामींची गोष्ट मालिकेच्या रूपात सांगायला मिळणे हा एक आनंददायी अनुभव आहे आणि नुसता आनंदच नाही तर हे आव्हानसुद्धा आहे कारण स्वामी चरित्र अफाट आहे. बावीस वर्षांहून अधिक काळ स्वामी अक्कलकोटमध्ये होते. तिथे त्यांनी शेकडो लीला केल्या आणि स्वामींच्या त्या प्रत्येक लीलेमागे एक अर्थ आहे. एक शिकवण आहे. आपल्याकडे लोक चमत्कार लक्षात ठेवतात पण त्यामागचे तत्त्व लक्षात ठेवत नाहीत. मी तेच तत्त्व उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.".

मालिकेचे निर्माते राकेश सारंग म्हणाले, “आजच्या काळात तुम्हा आम्हाला पडणाऱ्या कितीतरी अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं स्वामी चरित्रात मिळतात. त्यामुळे आजच्या पिढीला मठामधल्या प्रतिमेमागचे खरे स्वामी कळावेत आणि स्वामी भक्तांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा म्हणून मी ही मालिका करायचं ठरवलं. ही मालिका मनोरंजनाबरोबरच खूप काही शिकवण देऊन जाईल असं मला वाटतं आणि टीव्ही माध्यमाचा मूळ हेतू तोच आहे ना!"'जय जय स्वामी समर्थ' २८ डिसेंबरपासून सोम ते शनि संध्या. ९.३० वा. कलर्स मराठीवर पहायला मिळणार आहे.