Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बाबा रामदेव यांनी कपिल शर्मा शोमध्ये उलगडले हे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2017 18:15 IST

द कपिल शर्मा शोमध्ये झळकण्याची संधी मिळावी अशी अनेक सेलिब्रेटींची इच्छा असते. कपिल शर्माच्या कार्यक्रमात येऊन आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी ...

द कपिल शर्मा शोमध्ये झळकण्याची संधी मिळावी अशी अनेक सेलिब्रेटींची इच्छा असते. कपिल शर्माच्या कार्यक्रमात येऊन आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता योगगुरू बाबा रामदेव कपिलच्या कार्यक्रमात झळकणार आहेत. बाबा रामदेव यांचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. ब्रम्हचारी असलेले बाबा रामदेव यांनी लग्न केले नसले तरी त्यांना लग्नाचे अनेक प्रपोजल नेहमीच येत असतात. ड्रामा क्वीन राखी सावंतदेखील त्यांच्या प्रेमात होती. तिने त्यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छादेखील व्यक्त केली होती. केवळ राखीच नव्हे तर त्यांच्यासोबत लग्न करावेसे अनेक मुलींना वाटत आहे. लॉस एंजिलिसमध्ये एका तरुण मुलीने तर चक्क स्टेजवर येऊन त्यांना लग्नाची मागणी घातली होती, हा किस्सा त्यांनी द कपिल शर्मा शोमध्ये सांगितला आणि हा ऐकताच सगळे पोट धरून हसू लागले. त्यांनी सांगितले, "लॉस एंजिलिसमध्ये मी एक योगा सेशन घेण्यासाठी गेलो होतो. त्या सेशनला प्रचंड गर्दी होती. एक तरुण मुलगी स्टेजवर आली आणि तिने आपले प्रेम व्यक्त केले आणि चक्क लग्नाची मागणी घातली. एक सेकंद मी इतका गोंधळलो होतो की, काय सुरू आहे हेच मला कळत नव्हते." बाबा रामदेव यांनी हा किस्सा इतका मजेशीररित्या सांगितला की तेथील उपस्थितांना त्यांचे हसू आवरत नव्हते. ते पुढे म्हणाले की, "ती मुलगी कोणाचे ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी तिचे पालक स्टेजवर आले. ती त्याच्यासमोरदेखील मला लग्नासाठी प्रपोज करत होती. हा माझ्या आयुष्यातील दिवस मी कधीच विसरू शकत नाही".